Baramati News: दोन वर्षांत बारामती परिमंडलाने दिल्या ६१७९४ शेती वीज जोडण्या | Baramati electricity agricultural Constituency provided 61794 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agricultural pump

Baramati News: दोन वर्षांत बारामती परिमंडलाने दिल्या ६१७९४ शेती वीज जोडण्या

Baramati News : गेल्या दोन वर्षांत महावितरण बारामती परिमंडलाने शेतीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात आघाडी घेतली असून, एकूण 61 हजार 794 वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे. 30 मीटर अंतरातील प्रतिक्षा यादी जवळपास संपली आहे.

त्यामुळे अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेपासून जोडणीचे ठिकाण 30 मीटरपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करुन कोटेशन भरावे अशा सर्व शेतकऱ्यांना 31 मार्चच्या आत कनेक्शन देण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी परिमंडलातील अभियंत्यांना दिले आहेत.

शेतीपंपाच्या जोडणी करिता एप्रिल 2018 पासून मार्च 2022 पर्यंत 69 हजार 983 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. ह्या जोडण्या देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘कृषी धोरण-2020’ आणले.

या धोरणानुसार दोन वर्षांत जी वसुली झाली त्यातील 33 टक्के ‘कृषी आकस्मिक निधी’ गावपातळीवर व 33 टक्के निधी जिल्हा पातळीवर उपलब्ध झाला. त्यातून प्रलंबित जोडण्या देणे व वीज यंत्रणा सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले.(Latest Pune News)

अंतरानुसार प्रलंबित जोडण्याची संख्या पाहिली असता 30 मीटरच्या आतील 50 हजार 313 जोडण्यांपैकी 50 हजार 89 जोडण्या आज रोजी दिल्या आहेत. (Latest Marathi News)

31 ते 200 मीटर अंतरातील 12 हजार 160 पैकी 9262 तर 201 ते 600 मीटरपर्यंतच्या 7510 पैकी 2324 जोडण्या दिल्या आहेत.

याशिवाय 600 मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या 119 शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे वीज जोडणी देण्याचे काम महावितरण बारामती परिमंडलाने केले आहे. तसेच उर्वरित जोडण्या देण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे.

नजीकच्या शाखा कार्यालयात संपर्क साधावा

ज्या शेतकऱ्यांची 30 मीटर अंतरातील जोडणी प्रलंबित आहे किंवा ज्यांना नव्याने अर्ज करायचा असेल त्यांनी नजीकच्या महावितरण शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा.

या सर्व शेतकऱ्यांना तातडीने नवीन जोडण्या देण्यात येतील असे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी सांगितले.

24 वीज उपकेंद्रांचे काम प्रगतीपथावर :

कृषी आकस्मिक निधीतून बारामती परिमंडलात सद्यस्थितीत 24 वीज उपकेंद्रांचे काम हाती घेण्यात आले आहे. तर उपकेंद्रातील अतिउच्चदाब रोहित्राची क्षमतावाढ केली आहे. परिणामी महावितरणची भार क्षमता वाढल्याने शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करणे व नवीन जोडण्या देणे शक्य झाले आहे.