
बारामतीत सुगंधी झाडांचे उद्यान साकारले
बारामती: शहरात आता एक असे उद्यान तयार झाले आहे, जिथे गेल्यावर बारामतीकरांना मनसोक्त सुगंध मनात साठवून ठेवता येणार आहे. एखाद्याने मनावर घेतले तर त्या भागाचा कायापालट होऊ शकतो ही बाब बारामतीचे नगरसेवक जय पाटील यांनी दाखवून दिली आहे. स्वखर्चातून तब्बल बारा लाख रुपये खर्चून त्यांनी बारामतीतील पहिली सुगंधी फुलांची बाग विकसीत केली आहे. अनंत फ्लॉवर गार्डन असे याचे नामकरण केलेले असून स्वताः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मोकळेपणाने या उपक्रमाचे कौतुक करत जय पाटील यांना शाबासकीची थाप दिली.
बारामतीतील माऊलीनगरमधील सरस्वती विद्या मंदीर समोर 15 गुंठे मोकळी जागा होती. या जागेमध्ये जय पाटील यांनी सुगंधी फुलांची झाडे लावण्याचा संकल्प करत त्याला कुंपण करुन झाडे आणून ती व्यवस्थित लावली. इतके करुन ते थांबले नाहीत तर मोकळ्या जागेत त्यांनी या बागेत सकाळी व संध्याकाळी येणा-यांना व्यायाम करता यावा या साठी ओपन जिमही तयार केले.
या बागेतील विविध फुलांचा सुगंध मन प्रसन्न करणारा आहे. येथे गेल्यानंतर प्रत्येकाला फुलांच्य सुगंधामुळे छान वाटते, त्या मुळे या बागेचा उपयोग बारामतीकरांना निश्चित होईल, अशी खात्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बागेचा नगरपालिकेकडे हस्तांतर कार्यक्रम होता खरा मात्र या बागेला भेट दिल्यानंतर ही बाग जय पाटील यांनीच सांभाळावी अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. जय पाटील यांनी या पूर्वीही लावलेल्या विविध झाडांबद्दल पवार यांनी प्रशंसा करत सर्वच नगरसेवक व पदाधिका-यांनी असे उपक्रम हाती घ्यावेत व बारामतीकरांनी लावलेल्या झाडांची निगा राखावी असे मत त्यांनी बोलून दाखविले.या प्रसंगी पौर्णिमा तावरे, सचिन सातव, संभाजी होळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चौकट- या झाडांचा समावेश
• जाईजुई
• मोगरा
• अनंत
• बकुळ
• सोनचाफा
• सीताअशोक
• सीमारंजन
• बूच