

बारामती, ता. १६ : स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर बारामती शहरात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दुचाकींचे स्टंट करत अक्षरशः धिंगाणा घातला.
पोलिसांनाही स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम संपतानाच शहरातील रस्त्यावर उतरुन या तरुणाईला लगाम घालण्याचे काम करावे लागले. शहरातील विशिष्ट शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दुचाकी भरधाव वेगाने चालवत स्टंटबाजी करत, आरडाओरड करत मुलींना कट मारुन दहशत निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न केला. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध उभे राहून सेल्फी काढत वाहतुकीलाही अडथळा निर्माण केला गेला. यातील बहुसंख्य विद्यार्थी एका दुचाकीवर तिघे जण या प्रमाणे अत्यंत वेगाने दुचाकी दामटत, सायलेंसरचे आवाज काढत रस्त्यांवरुन बेलगामपणे फिरत होते. अनेक दुचाकी वाहनांना नंबरप्लेट नसल्याने त्यांच्यावर कारवाई करणेही मुश्किल बनले होते. वाहतूक व शहर पोलिसांनी रस्त्यावर उतरत या प्रकरणी कारवाईचा पवित्रा घेतला होता. दरम्यान, पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली असून या पुढे पालकांना अशा प्रकरणात कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. विशिष्ट शाळा व महाविद्यालयातील हे विद्यार्थी बेलगामपणे दुचाकी चालवत असल्याने पोलिसही काही काळ चक्रावून गेले होते. काही महिला पोलिसांनी त्यातील युवकांना अडवून कारवाई केली. मुख्याध्यापक व प्राचार्यांनीही या बाबीची गंभीर नोंद घेत आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी अशा प्रकारात सहभागी होणार नाहीत, यासाठी काळजी घ्यावी याबाबत त्यांनाही माहिती देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.