Baramati News : बारामतीत जवानाला मिळाले जीवदान....

आयुष्याची दोरी बळकट असेल तर अनेकदा क्लिष्ट बाबीतून माणूस बाहेर येतो, याचाच प्रत्यय बारामतीतील एका जवानाला आला.
gun Bullet
gun Bulletsakal

बारामती - आयुष्याची दोरी बळकट असेल तर अनेकदा क्लिष्ट बाबीतून माणूस बाहेर येतो, याचाच प्रत्यय बारामतीतील एका जवानाला आला.

फेब्रुवारी महिन्यामध्ये मणीपूरमध्ये उसळलेल्या दंगलीदरम्यान इंडोतिबेटीयन बॉर्डर सिक्युरीट फोर्स या निमलष्करी दलातील कर्तव्यावर तैनात असलेल्या शंकर मदने यांना गोळीबारात गोळी लागली.

ही गोळी मानेच्या खाली बाजूला जाऊन शरीरातच अडकली होती. मणीपूरच्या अस्थिर वातावरणामुळे त्यांना दिल्ली येथे जाऊन उपचार करुन घेण्यास त्यांच्या कार्यालयाने सांगितले होते. शंकर मदने हे नीरावागज येथील रहिवासी असल्याने त्यांनी आपल्याच भागात उपचार घेण्यास प्राधान्य दिले.

ते उपचारासाठी बारामतीला आले होते. त्यांनी काही डॉक्टरांशी सल्लामसलतही केली. ही गोळी मानेच्या नजिक चौथ्या मणक्याजवळ असल्याने ती शस्त्रक्रीया करुन काढणे जिकीरीचे व धोक्याचेही होते.

शस्त्रक्रीयेदरम्यान अपंगत्वाची भीती असल्याचे त्यांना सांगितले गेले होते. मान वळविताना तसेच खाताना व गिळताना वेदना होत होत्या. गोळी वेळेत निघाली नसते तर त्यांच्या जीवावर बेतले असते.

बारामतीतील डॉ. वैभव मदने यांच्याकडे त्यांनी सल्ला घेतल्यानंतर त्यांनी ही गोळी काढता येईल, असे नमूद केले. अत्यंत कौशल्यपूर्ण शस्त्रक्रीया करुन ही गोळी रुग्णाला इतर काहीही इजा न होता त्यांनी यशस्वीपणे काढली. आता रुग्णाची तब्येत स्थिर असल्याचे डॉ. मदने यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com