

बारामती, ता. ५ : येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. ५) ज्वारीला प्रतिक्विंटल ९,५०० रुपये, उडदाला १०,१०० रुपये तर बाजरीला ३,६५१ रुपये, असा उच्चांकी बाजारभाव मिळाला.
बाजार समितीत बारामतीसह फलटण, दौंड, इंदापूर, माण आदी परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होत आहे. समितीचे आडतदार शिवाजी फाळके यांच्या अडतीवर शेतकरी मनोज जाधव यांच्या ज्वारीला खरेदीदार महावीर वडुजकर यांनी ९,५०० रुपयांची बोली लावली. तसेच, अशोक सालपे अॅण्ड सन्स यांच्या अडतीवर शेतकरी अमित खराडे यांच्या ज्वारीला ९,४९० रुपये बाजारभाव मिळाला. खरेदीदार राज केशवराव मचाले यांनी चढ्या भावाने बोली लावत ज्वारीची खरेदी केली. जयकुमार जिवराव शहा अॅण्ड कंपनी यांच्या अडतीवर शेतकरी धोंडिराम पवार यांच्या उडदाला १०,१०० रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. खरेदीदार संतोष श्रीमल गुगळे यांनी हा माल खरेदी केला. अशोक सालपे अॅण्ड सन्स व वैभव दशरथ शिंदे यांच्या अडतीवर शेतकरी नामदेव पवार व तानाजी कर्णे यांच्या बाजरीला ३,६५१ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. महावीर वडुजकर व बाळासाहेब फराटे यांनी बाजरीची खरेदी केली. यावेळी खरेदीदार बाळासाहेब फराटे, जगदीश गुगळे, सचिन सातव, प्रताप सातव, बाळासाहेब वीर, किरण सोनवणे, राज केशवराव मचाले, महावीर वडुजकर तसेच संस्थेचे संचालक मिलिंद सालपे उपस्थित होते.
समितीच्या वतीने उच्चांकी बोली लावणाऱ्या खरेदीदारांचे स्वागत करण्यात आले. पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. समितीत सध्या ज्वारीला २,७०० ते ९,५००, बाजरीला २,४०० ते ३,६५१, उडदाला ७,००० ते १०,१००, गव्हाला २,५५० ते ३,२११ आणि हरभऱ्याला ६,५०० ते ७,३०० रुपये बाजारभाव मिळत आहे.
शेतकऱ्यांनी शेतमालाची योग्य प्रतवारी करून बाजार समितीत आणावा, त्यामुळे उच्चांकी बाजारभाव मिळण्यास मदत होते, असे आवाहन सभापती विनायक गावडे यांनी केले. शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पट्टी अदा केली जाते. तसेच लिलावापूर्वी अचूक वजन व रास्त बाजारभाव मिळत असल्याने बाहेरील तालुक्यांतूनही मोठ्या प्रमाणात शेतमाल बारामती बाजार समितीत दाखल होत आहे, अशी माहिती सचिव हौसेराव कोकरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.