Loksabha 2019 : दौंडमध्ये भाजपसाठी पैसे वाटल्याप्रकरणी उपसरपंचाविरुद्ध गुन्हा

प्रफुल्ल भंडारी
गुरुवार, 25 एप्रिल 2019

भाजप उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी गणेश जगदाळे हा मतदारांना पैसे वाटत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची लेखी मागणी अश्विन वाघमारे यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे केली आहे. संशयित आरोपी गणेश जगदाळे यास अटक करण्यात आली नसून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी तथा सहायक पालिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी दिली. 

दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील लिंगाळी (ता. दौंड) येथे मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी उपसरपंच गणेश जगदाळे याच्याविरूध्द मतदारांना लाच देऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप उमेदवार कांचन राहुल कुल यांच्यासाठी गणेश जगदाळे एका मताला शंभर रूपये याप्रमाणे पैसे वाटत होता.  

दौंड पोलिस ठाण्यात या बाबत आज (ता. २४) ग्राम विकास अधिकारी विलास भापकर यांनी या फिर्याद दाखल केली आहे. लिंगाळी येथील पासलकर वस्ती मधील मतदान केंद्राजवळ काल (ता. २३) उपसरपंच गणेश जगदाळे हा मतदारांना पैसे वाटत होता. एका मतासाठी शंभर रूपये याप्रमाणे पैशांचे वाटप केले जात होते. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी पैसे वाटण्याच्या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण निवडणूक प्रशासनाला पाठविले होते. सदर प्रकाराची माहिती मिळताच भरारी पथक तेथे दाखल झाले होते परंतु त्यांना पैसे वाटणारा आढळून आला नव्हता. दरम्यान आज (ता. २४) सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या आदेशानुसार भरारी पथकातील अधिकारी हनुमंत भापकर यांनी गणेश जगदाळे याने मतदारांना प्रलोभन दाखविण्यासह पैसे वाटप केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान मधील कलमानुसार फिर्याद दाखल केली.

गणेश जगदाळे हा राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार तथा भाजप उमेदवार कांचन कुल यांचे पती राहुल कुल यांचा सक्रिय समर्थक आहे.

भाजप उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी गणेश जगदाळे हा मतदारांना पैसे वाटत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची लेखी मागणी अश्विन वाघमारे यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे केली आहे. संशयित आरोपी गणेश जगदाळे यास अटक करण्यात आली नसून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी तथा सहायक पालिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी दिली. 

संबंधित बातमी :
Loksabha 2019 : पुणे : दौंड तालुक्यात पैसे वाटपाचा धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati Loksabha constituency money distribute for BJP candidate in Daund