

बारामतीत मंडईबाबतच्या निर्णयावरून परस्परविरोधी प्रतिक्रिया
बारामती, ता. १९ : शहरातील इंदापूर रस्ता तसेच सूर्यनगरी परिसरात रस्त्यावर बसणारी मंडई बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बारामती नगर परिषदेने घेतला आहे. याबाबत अधिकृत प्रसिद्धिपत्रक काढून या पुढे रविवारी किंवा गुरुवारी रस्त्यावर व्यवसाय केल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान नगर परिषदेने सर्वसाधारण सभेत केलेल्या या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
बारामतीतील गणेश मार्केट परिसरात बस स्थानकापर्यंतच्या रस्त्यांवर आणि सूर्यनगरीतील अनेक रस्त्यांवर काही विक्रेते दर गुरुवारी दिवसभर ठाण मांडून बसतात. या परिसरातील बारामतीतील रहिवाशांना याचा कमालीचा त्रास होतो. या बाबत अनेकदा तक्रारी झाल्यानंतर नगरपरिषदेने त्यांच्या सर्वसाधारण सभेत रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात ठाम भूमिका घेत ठराव केला.
आता याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही जणांनी त्याला विरोधाची भूमिका घेतली आहे. या विक्रेत्यांमध्ये बारामतीबाहेरून केवळ व्यवसायासाठी येणाऱ्या विक्रेत्यांचे प्रमाण मोठे असून त्यांना बारामतीतील रहिवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल काही देणे घेणे नसल्याची या परिसरातील नागरिकांची भावना आहे.
कर्मचारीही अस्वस्थ...
एकीकडे अतिक्रमण केल्यावर कारवाई केली नाही तर टीका होते, दुसरीकडे अतिक्रमण काढल्यावरही अनेकांचे फोन येतात, काम तरी कसे करायचे, नगरपालिकेचे कर्मचारी म्हणजे सुपरमॅन नाहीत ही बाब सर्वांनी लक्षात घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया एका कर्मचाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
स्थानिकांना कमालीचा त्रास...
सूर्यनगरीतील गुरुवार व रविवारचा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय हा कोणत्याही व्यक्तीच्या, व्यापाऱ्याच्या किंवा व्यवसायाच्या विरोधातून घेतलेला नाही. सूर्यनगरीतील स्थानिकांना होणारा त्रास, वाहतूक व पार्किंगची समस्या, आपत्कालीन परिस्थितीतील अडथळे, कचरा व अस्वच्छता, अंगणवाडीतील लहान मुलांना होणारा त्रास, तसेच रोज व्यवसाय करणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांचे प्रश्न या सर्व बाबींचा विचार करून हा विषय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. - प्रवीण माने, स्थानिक नगरसेवक.
ठरावानुसार अंमलबजावणी करणार...
सर्वसाधारण सभेने जो निर्णय घेतला आहे, त्यानुसार नगरपरिषद प्रशासन त्याची अंमलबजावणी करणार आहे. रस्त्यावर विक्री करून स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. - पंकज भुसे, मुख्याधिकारी, बा.न.प.
स्थानिकांना वाऱ्यावर सोडणार नाही...
यात स्थानिक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मात्र रस्त्यावर विक्री करण्याच्या प्रकाराने स्थानिक नागरिकांना त्रासही होऊ देणार नाही. यातून उद्या अपघात झाला किंवा दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, या विषयाने अनेक प्रश्न निर्माण झाले असून स्थानिकांच्या हिताला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देणार.
- सचिन सातव, नगराध्यक्ष, बा.न.प.
स्थानिकांना वाऱ्यावर सोडू नये
स्थानिक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कोणताही निर्णय घेतल्यास त्याला आमचा विरोध असेल. शेतकऱ्यांची पर्यायी व्यवस्था नगरपरिषदेने केली पाहिजे.
- मंगलदास निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते
शेतकऱ्यांना पर्यायी जागा द्यायला हवी
या मध्ये स्थानिकांना त्रास होता कामा नये, शेतकऱ्यांना पर्यायी जागा द्यायला हवी, कोणाचेही नुकसान होता कामा नये याची जबाबदारी नगरपरिषदेने घ्यावी.
- आरती शेंडगे, नगरसेविका, बा.न.प.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.