esakal | बारामतीत बीएसएनलच्या अनेक ग्राहकांना होतोय मनस्ताप
sakal

बोलून बातमी शोधा

BSNL customers

बारामतीत विविध ठिकाणी विकासकामे सुरु असल्याने खोदकाम सुरु असल्याने अनेक लँडलाईनचे दूरध्वनी गेल्या कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत.

बारामतीत बीएसएनलच्या अनेक ग्राहकांना होतोय मनस्ताप

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : भारत संचार निगममध्ये (बीएसएनएल) पुरेसे मनुष्यबळ नसल्याचा फटका सध्या ग्राहकांना सहन करावा लागत आहे. बारामतीत विविध ठिकाणी विकासकामे सुरु असल्याने खोदकाम सुरु असल्याने अनेक लँडलाईनचे दूरध्वनी गेल्या कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. वारंवार तक्रारी करुनही दूरध्वनी दुरुस्तीसाठी कोणी जात नाही अशा स्वरुपाच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
 
शहरात नीरा डावा कालव्यासह विविध ठिकाणी खोदकाम सुरु असल्याने केबल तुटल्या आहेत. काही ठिकाणी केबल दुरुस्ती झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले, मात्र दूरध्वनी तरीही बंद अवस्थेतच आहेत. पुरेसे मनुष्यबळच उपलब्ध नसल्याची बीएसएनएलची अवस्था दयनीय आहे.
 
माहितीनुसार 31 जानेवारी रोजी बारामती कार्यालयात 64 कर्मचारी कार्यरत होते. मात्र स्वेच्छानिवृत्ती योजनेमध्ये एकाच दिवशी 49 जणांनी निवृत्ती घेतली. त्या नंतर तीन जण निवृत्त झाले. आज संपूर्ण बारामती विभागासाठी फक्त 15 कर्मचारी कार्यरत असून त्यातील दुरुस्तीची कामे करणा-यांची संख्या पाच आहे. 

बारामती मंडलामध्ये 4500 दूरध्वनी तर 1600 ब्रॉडबँडधारक आहेत. इतक्या मोठ्या संख्येत ग्राहक असतानाही पुरेसे लाईनमन नसल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. सोमेश्वरपासून ते अंथुर्णेपर्यंत विस्तारलेला व्याप असल्याने ग्राहकांच्या तक्रारी वेळेत दूर होत नाहीत. 

शहरातील काही भागात दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा बीएसएनएलच्या सूत्रांनी केलेला असला तरी प्रत्यक्षात अनेक दूरध्वनी गेल्या काही महिन्यांपासून बंद असताना संपूर्ण रकमांची बिले ग्राहकांना नाईलाजाने भरावी लागत आहेत. जर सेवाच मिळत नसतील तर बिले का भरायची असा लोकांचा प्रश्न आहे. 

या संदर्भात बीएसएनलच्या मंडल अभियंत्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला अधिकृतपणे प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नसल्याचे नमूद केले.