बारामतीच्या बाजारपेठेत दिवाळीची सुरु झाली लगबग

The Baramati market has almost started shopping for Diwali.jpg
The Baramati market has almost started shopping for Diwali.jpg

बारामती : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज रविवारचे औचित्य साधून बारामतीकरांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. कोरोनाचे संकट बारामतीवरुन हळुहळू दूर होत असल्याने आता दिवाळीच्या खरेदीसाठी लोक सहकुटुंब घराबाहेर पडल्याचे चित्र आज दिसले. 

शहरातील रस्त्यांसह दुकानातही दिवाळीची चाहूल लागल्याचे वातावरण होते. पणत्या, आकाशकंदील, उटणे, रांगोळी, नवीन वर्षांची कॅलेंडर, किल्ल्यावरील चित्रे विक्री करणा-या स्टॉल्सपासून अनेकविध वस्तू विक्रीची दुकाने आज बारामतीच्या व्यापारपेठेत थाटलेली दिसून आली. इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, वाहनविक्री, सराफ व्यावसायिक, कापड व्यावसायिकांपासून ते फुलांच्या दुकानातही लोकांनी मोठी गर्दी केली होती. परस्परांना भेट देण्यासाठी भेटवस्तूंसह मिठाई, फळे, चॉकलेट खरेदीसाठीही आज गर्दी दिसत होती. 

शहरातील भिगवण चौक ते इंदापूर चौक, भिगवण चौक ते गांधी चौक, गांधी चौक ते गुनवडी चौक या रस्त्यांसह भिगवण रस्त्यांवरील दुकानातही आज खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. शहरातील विविध किराणा मॉल्समध्येही किराणासह जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी केवळ बारामती शहरच नाही तर आसपासच्या भागातूनही लोक चार चाकी वाहनातून आल्याचे दिसत होते.

किराणापासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि सोन्यापासून ते कापडापर्यंत सर्वच दुकानात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत रोषणाई, मंडप व डेकोरेशन केलेले आहे. यंदा भिगवण रस्त्यावर बारामती सहकारी बँकेशेजारी फटाका स्टॉल्स लावण्यात आले आहेत. 

उत्साह कायमच

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचा उत्साह दरवर्षी इतका जरी नसला तरी सण तितक्याच उत्साहाने साजरा करायचा निर्धार बारामतीकरांनी करण्याचे ठरवले असल्याने बाजारात हळुहळू गर्दी होताना दिसत आहे. मास्क, सॅनेटायझरचा वापर होत असून लोक आपणहूनच सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत आहेत. 

कारखान्याच्या पेमेंटमुळे दिलासा

पंचक्रोशीतील माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती या तिन्ही साखर कारखान्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना पैसे दिलेले असल्याने बारामतीच्या व्यापारपेठेला त्याचा दिलासा मिळाला आहे. 

बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी म्हणले, यंदा कोरोनामुळे किती व्यवसाय होईल याची धास्ती होती, पण प्रत्यक्षात समाधानकारक वातावरण आहे. लोकांचे जनजीवन पूर्वपदावर आल्यासारखे वाटत असून लोक खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com