पोलिसांच्या समुपदेशनानंतर तरुणी पालकांच्या स्वाधीन

पोलिसांच्या समुपदेशनानंतर 
तरुणी पालकांच्या स्वाधीन
Published on

बारामती, ता. १२ : कौटुंबिक कारणांमुळे आई-वडिलांसोबत न राहता मैत्रिणीकडे जाण्याचे सांगून घरातून निघून गेलेल्या तरुणीचा बारामती शहर पोलिसांनी शोध घेतला. महिला पोलिसांनी केलेल्या समुपदेशनानंतर या तरुणीला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून बारामती शहर पोलिस ठाण्यात तरुणी हरविल्याची नोंद करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शोध सुरू केला. पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या समन्वयातून महिला पोलिस हवालदार मोनिका मोहिते व ज्योती डीसले यांनी तरुणीचा शोध घेतला.
समुपदेशनादरम्यान तरुणीने धक्कादायक माहिती दिली. कुटुंबीयांच्या ओळखीतील एका व्यक्तीने स्वतंत्र मोबाइल देऊन संपर्क वाढविला व वैयक्तिक फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सामाजिक संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगणाऱ्या दुसऱ्या तरुणाने मदतीचे व लग्नाचे आमिष दाखवून जवळीक वाढविली होती.
तिला कुटुंबापासून दूर ठेवण्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था तसेच आई-वडिलांविरोधात एआयच्या मदतीने अर्ज तयार करण्याचा प्रयत्न झाल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व विधिज्ञांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. पोलिसांनी कोणताही निर्णय न लादता सुरक्षित पर्याय समजावून सांगितल्यानंतर, तरुणीने स्वतःच्या इच्छेने आई-वडिलांसोबत घरी जाण्याचा निर्णय घेतला. मुलगी सुरक्षित परतल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com