बारामती : कोरोनाकाळात लढणाऱ्या महावितरणच्या योद्धांचा स्वातंत्र्यदिनी होणार सत्कार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावीपणे उपाययोजना सुरु आहे.

बारामती : कोरोनाच्या प्रादुर्भावात विविध आव्हानांना सामोरे जात आपत्कालीन परिस्थितीत अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम केले. या विशेष कामगिरी बजावणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुणे प्रादेशिक कार्यालयस्तरावर येत्या स्वातंत्र्यदिनी विशेष गौरव करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावीपणे उपाययोजना सुरु आहे. लॉकडाऊनच्या कालावधीपासून रुग्णालयांसह विविध विभागांची महत्वाची कार्यालये, इतर अत्यावश्यक सेवा तसेच घरून काम (वर्क फ्रॉम होम) करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 24 तास सुरळीत वीजपुरवठा देण्याचे कर्तव्य महावितरणचे अभियंता व तांत्रिक कर्मचारी अविश्रांत व युद्धपातळीवर बजावत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यावर तसेच अवकाळी वादळी पाऊस व ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा आदींमुळे वीजयंत्रणेची मोठी हानी झाली तरी अहोरात्र कामे करून कमीतकमी वेळेमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

संसर्गाचा धोका टाळून किंवा झाल्यास त्याचा यशस्वी मुकाबला करून तसेच कोरोना संकटामुळे अनेक मर्यादा असताना अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कामगिरीची दखल घेऊन पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुणे प्रादेशिक कार्यालयस्तरावर येत्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यासाठी आठ मंडल कार्यालय अंतर्गत प्रत्येकी एक शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचारी निवडण्यात येणार आहे. त्यासाठी रास्तापेठ, गणेशखिंड, पुणे ग्रामीण, बारामती, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली मंडल कार्यालयांकडून अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची या गौरवासाठी निवड करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati MSEB employees who fought during the Corona period will be felicitated on Independence Day