अन् बारामती नगरपालिकेचे वातावरणच बदलून गेले...

मिलिंद संगई
Monday, 10 February 2020

बारामती नगरपालिकेतील नगरसेवकांमधील मतभेद व गटतटांच्या राजकारणाची जागा सध्या विविध विकासकामांसाठी एकत्रित काम करण्याने घेतल्याचे सुखद चित्र दिसत आहे. 

बारामती : सत्तेचा परिणाम सर्वांगाने दिसतो, अनेक समीकरणे बदलण्याची ताकद सत्तेत असते ही बाब पुन्हा एकदा बारामतीकर अनुभवत आहेत. बारामती नगरपालिकेतील नगरसेवकांमधील मतभेद व गटतटांच्या राजकारणाची जागा सध्या विविध विकासकामांसाठी एकत्रित काम करण्याने घेतल्याचे सुखद चित्र दिसत आहे. 

अजित पवारांनी दिला बारामती नगरपालिकेला बूस्टर डोस

स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच कामाचा धडाका सुरु केल्यानंतर नगरसेवकांनाही त्यांच्या अपेक्षेनुसार काम करण्याशिवाय सध्या पर्याय नसल्याने गटतट व मतभेद विसरुन सर्वच नगरसेवक विविध विकासकामे सुचविण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. आपापल्या भागातील प्रलंबित प्रश्न तातडीने प्रशासनाकडे देऊन त्यासाठीची तरतूद किती लागेल याच्या याद्या बनविण्याची तयारी सुरु असल्याने नगरपालिकेतील वातावरणच बदलून गेले आहे. 

गेली पाच वर्षे सत्ता नसल्याने सातत्याने निधीची चणचण भासत होती, त्या मुळे अनेक कामे मागे ठेवावी लागली. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता कामे शोधून काढण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अजित पवार हे नगरपालिकेच्या विविध विकासकामांसाठी भरीव तरतूद करीत असल्याने व नगरसेवकांवरच त्यांनी विकासकामांची यादी करण्याची जबाबदारी सोपविल्याने आता नगरपालिकेतील वातावरणच बदलून गेले आहे. प्रत्येक विभागासह नगरसेवकही प्रलंबित कामांबाबत सजग झाल्याचे दिसत आहे. बारामतीत रस्त्यांची तब्बल 465 कामे मार्गी लावण्याचे महत्वाकांक्षी उद्दीष्ट अजित पवारांनी नजरेसमोर ठेवले आहे. सुचवाल ते प्रत्येक काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही मिळाल्याने नगरसेवकांमध्येही उत्साह संचारल्याचे दिसत आहे. 

पुढील दोन वर्षे काम दाखविण्याची संधी असल्याने व खुद्द अजित पवार यांनीच बारामतीच्या विकासासाठीचे प्रकल्प मार्गी लावण्याचे मनावर घेतल्याने नगरसेवकही आता वेगाने कामाला लागल्याचे चित्र बारामतीत दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati Municipal corporation changes its atmosphere due to development work