Baramati News : बारामतीत इन्स्टाग्रामवरील स्टेटस पोलिसांनी तपासले अन पिस्तूलाची देवाणघेवाण करणारी साखळीच समोर आली

इन्स्टाग्रामच्या स्टेटसवरुन बारकाईने तपास झाल्यानंतर पिस्तूलाची देवाणघेवाण करणारी एक साखळीच बारामतीत कार्यरत असल्याचे उघड झाले.
baramati police found gangs of selling pistol on instagram social media
baramati police found gangs of selling pistol on instagram social mediaSakal

बारामती - इन्स्टाग्रामच्या स्टेटसवरुन बारकाईने तपास झाल्यानंतर पिस्तूलाची देवाणघेवाण करणारी एक साखळीच बारामतीत कार्यरत असल्याचे उघड झाले. कोयत्याचे चित्र ठेवणा-या युवकाविरुध्द बारामती तालुका पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल असल्याचेही पुढे आले आणि त्यातून एक साखळीच पुढे आली आहे.

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरु असल्याने पोलिस विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. पोलिस सातत्याने समाजमाध्यमांवर नजर ठेवून आहेत. बारामती तालुक्यातील सावळ येथील आकाश शेंडे याने इन्स्टाग्रामला धारदार कोयत्याचे स्टेटस ठेवल्याचे फौजदार राजेश माळी यांना दिसले.

आकाश शेंडे याला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल असलेलेही फोटो पोलिसांच्या निदर्शनास आले. या बाबत चौकशी केल्यानंतर त्याचा साथीदार रोहित वणवे (रा. लाकडी, ता. इंदापूर) याच्याकडे पिस्तूल दिल्याचे त्याने नमूद केले. त्या नंतर रोहित वणवे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल व एक मोकळी पुंगळी सापडली.

तपासात रोहित वणवे याने हे पिस्तूल सागर भिंगारदिवे (रा. तांदुळवाडी, ता. बारामती) याच्याकडून दोन महिन्यांपूर्वी विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस पथकाने सागर भिंगारदिवे याच्याकडे चौकशी केल्यानंतर ते ओंकार महाडीक (रा. बारामती) याच्याकडून घेतल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांनी ही साखळी जोडली असून आता ओंकार महाडीक याचा शोध पोलिस घेत आहेत. आकाश शेंडे, रोहित वणवे व सागर भिंगारदिवे यांना अटक केली असून आणखी यात किती जण सहभागी आहेत याचा तपास वेगाने सुरु केल्याची माहिती सहायक पोलिस निरिक्षक राहुल घुगे यांनी दिली.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल घुगे, राजेश माळी, फौजदार गणेश पाटील, दत्तात्रय लेंडवे, राम कानगुडे, अतुल पाटसकर, बापू बनकर, अमोल नरुटे, तुषार लोंढे यांनी ही कामगिरी केली.

पोलिसांचे समाजमाध्यमांवर बारकाईने लक्ष

कायदा व सुव्यवस्था बिघडविणा-या समाजकंटकांवर पोलिस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. समाजमाध्यमांदवारे दहशत पसरविणे किंवा स्टेटस ठेवणे अशा बाबी आढळल्या तर पोलिस कडक कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com