पोलिसाच्या हाताला चावा घेऊन हल्लेखोर पसार

पोलिसाच्या हाताला चावा घेऊन हल्लेखोर पसार
Published on: 

बारामती, ता. १९ : विमानतळाजवळ उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर रविवारी (ता. १९) गोळीबार करून लोखंडी सत्तूरने वार केल्याप्रकरणी एका संशयिताला हल्ला झाल्यानंतर लगेचच पोलिस अंमलदार नितीन यांनी पकडले होते; मात्र त्या वेळेस झालेल्या गोंधळात नितीन यांच्या हाताला चावा घेऊन संशयित हल्लेखोर शेतातून पळून गेल्याची बाब समोर आली आहे.
या प्राणघातक हल्ल्यानंतर पोलिसांची विविध पथके शोधमोहीम राबवित असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी पहाटे गुन्हा दाखल केला असून लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी (रा. सणसर, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. राणा यांच्या सुरक्षेसाठी वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. याच सुरक्षा यंत्रणेतीलच एका पोलिसाने या हल्लेखोरास चपळाईने पकडले होते. हल्ल्यामुळे तेथे गोंधळ झाला व यात हल्लेखोर नितीन यांच्या हाताला जोरदार चावा घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जर हा हल्लेखोर पकडला गेला असता तर अनेक गोष्टी सहजतेने समोर आल्या असत्या. पोलिसांनी या बाबतही तपासाची दिशा निश्चित केली असून सर्व शक्यतांवर पोलिस काम करत आहेत.
बारामती पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळी तपास करण्यात आला आहे. हे हल्लेखोर नेमके कोण होते, हल्ल्यामागचे प्रमुख कारण काय असावे या व इतर अनेक बाबींचा तपास पोलिसांनी वेगाने सुरू केलेला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामतीतील या हल्ल्याची गांभीर्याने दखल घेत पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणी तातडीने गुन्हेगारांना गजाआड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्या पातळीवर सीसीटीव्ही कॅमेरे तपासणे, नाकाबंदी, संशयित लोकांची तपासणी, तांत्रिक विश्लेषण यासह इतरही अनेक मुद्द्यांवर विविध पथकांकडून तपास सुरू आहे. स्वत: पोलिस अधीक्षक तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक या घटनेच्या तपासावर लक्ष केंद्रीत करत आहेत.

या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन गुन्हेगारांना तातडीने अटक होईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, यासाठी आम्ही ठामपणे पाठपुरावा करू. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.
- सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com