सोमेश्वर कारखान्याला न्यायालयाचा दणका

सोमेश्वर कारखान्याला न्यायालयाचा दणका
Published on

सोमेश्वरनगर, ता. ६ : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालकी हक्काच्या जागेतील व्यावसायिक गाळे व निवासी घरे यांच्या मार्गातील पत्रे अथवा इतर अडथळे दूर करावेत. तसेच पूर्वीप्रमाणे निर्बंधविरहित ये-जा उपलब्ध करून द्यावी, असा अंतरिम आदेश बारामती न्यायालयाने दिला आहे.

''सोमेश्वर''ने ऊस वाहतूक सुरळीत व्हावी, गव्हाण विस्तारीकरण करावे यासाठी मालकी हक्काच्या जागेत ३०-४० वर्षे व्यवसाय करणाऱ्यांना व राहणाऱ्यांना प्रस्ताव दिला होता. त्यानुसार कारखाना आधी गाळे उभारणार आणि त्यानंतर सध्याचे जुने गाळे पाडून मग स्थलांतर करणार, असे नियोजन होते. चर्चेच्या फेऱ्यानंतर काही गाळेधारकांनी संमती दिली तर काही न्यायालयात गेले. दरम्यान, कारखान्याने रस्त्याकडेला, दुकान लाइनसमोर पत्रे ठोकले. याबाबत महेश सत्तेगिरी व इतरांनी कार्यकारी संचालकांसह इतरांविरोधात बारामती न्यायालयात मनाईचा दावा दाखल केला. यावर अंतिम निकाल येईपर्यंत न्यायालयाने तूर्तास अंतरिम आदेश दिला आहे. घरांकडे व गाळ्यांकडे जाणाऱ्या मार्गावर उभारलेले पत्रे अथवा इतर अडथळे दूर करून पूर्वीप्रमाणे ये-जा करण्याचा मार्ग उपलब्ध करून द्यावा. तसेच अंतिम निकालापर्यंत कारखान्याचे प्रतिनिधी, कर्मचारी, अभिकर्ते यांनी तक्रारदारांच्या हक्कात कोणताही अडथळा निर्माण करण्यास किंवा विद्यमान स्थितीत बदल करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे कारखान्याकडून पालन न झाल्यास व्यावसायिकांना आवश्यक कार्यवाहीचे स्वातंत्र्य राहील. अशा परिस्थितीत आवश्यक असल्यास वडगाव निंबाळकर पोलिसांनी मदत उपलब्ध करून द्यावी, अशीही सूचना न्यायालयाने केली आहे. दरम्यान, काही गाळेधारकांनी तक्रार केलेली नसल्याने सर्वच पत्रे काढण्याचा आदेश देणे उचित होणार नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
व्यावसायिक प्रतिनिधी नितीन कुलकर्णी यांनी न्यायालयाने व्यावसायिकांना दिलासा दिला असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली.


या निर्णयाची अंमलबजावणी थांबवावी यासाठी कारखान्याने तातडीने मंगळवारी (ता. ४) बारामती न्यायालयास अर्ज सादर केला असून त्यावर युक्तिवादही झाला आहे. न्यायालयाप्रति आदर आहेच, मात्र या आदेशाची अधिकृत नक्कल प्राप्त होताच जिल्हा न्यायालयात अपील करत आहोत. तसे अपील करण्याचा कारखान्यास हक्क आहेच. मात्र तत्पूर्वीच पत्रे काढले गेले. याशिवाय, कारखान्याने याआधीच ऊस वाहतूक, शालेय विद्यार्थी वाहतूक समस्या आणि कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी जागा मोकळी करून द्यावी, असा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. ही सभासदांनी मोफत दिलेली जागा आहे.
- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com