बारामतीत पार्किंगच्या जागी अनधिकृत बांधकाम

बारामतीत पार्किंगच्या जागी अनधिकृत बांधकाम
Published on: 

बारामती, ता. २१ : शहरातील कॅनॉल रोड येथील ''ननावरे गाढवे कॅपिटल'' या इमारतीमध्ये मंजूर नकाशाचे उल्लंघन करून पार्किंगच्या जागी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर परिषदेचे क्षेत्रीय अधिकारी हर्षल इंगुले यांनी फिर्याद दिली आहे. कॅनॉल रोडवरील ''ननावरे गाढवे कॅपिटल'' या इमारतीस नगर परिषदेकडून ९ एप्रिल २०२२ला सुधारित बांधकाम परवाना देण्यात आला होता. या मंजूर नकाशात ६ मोटार आणि १२ दुचाकी पार्किंगची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर इमारत वापरासाठी सक्षम प्राधिकरणाकडून ९ डिसेंबर २०२३ला ''फुल ऑक्युपन्सी सर्टिफिकेट'' (भोगवटा प्रमाणपत्र) देखील देण्यात आले होते. नगर परिषदेच्या आदेशानुसार क्षेत्रीय अधिकारी हर्षल इंगुले यांनी २३ जून २०२६ला या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली असता, मंजूर नकाशात दर्शवलेली पार्किंगची जागा गायब असल्याचे आणि अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी नगर परिषदेने अजिंक्य जनार्दन रणदिवे, किशोर रुद्रमणी गाढवे आणि उमेश शशिकांत ननवरे यांना ९ जुलै २०२६ला नोटीस बजावून एक महिन्याच्या आत अनधिकृत बांधकाम काढून पूर्ववत स्थिती करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, दिलेली मुदत ९ ऑगस्टला संपूनही संबंधितांनी हे बांधकाम काढले नाही किंवा परवानगीसाठी अर्जही केला नाही. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १८ ऑगस्ट २०२४ला दोन पंचांसमक्ष पंचनामा करून २० ऑगस्टला पोलिसांत तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानुसार बारामती शहर पोलिस ठाण्यात अजिंक्य जनार्दन रणदिवे, किशोर रुद्रमणी गाढवे आणि उमेश शशिकांत ननवरे (सर्व रा. बारामती) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२(१)(ब) आणि ५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com