बारामतीचा अभिषेक ठरला देशातील पहिला युवा आयर्नमॅन..... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिषेक याने 13 तास 33 मिनिटांची वेळ नोंदवून आयर्नमॅन किताब पटकावला

बारामतीचा अभिषेक ठरला देशातील पहिला युवा आयर्नमॅन....

बारामती : अत्यंत खडतर मानल्या जाणा-या जागतिक स्तरावरील आयर्नमॅन स्पर्धेत यशस्वी कामगिरी करत बारामतीच्या अभिषेक सतीन ननवरे याने यशाला गवसणी घातली आहे. अवघ्या अठराव्या वर्षी उत्तम वेळेची कामगिरी नोंदवत त्याने भारतातील ग्रामीण भागातील सर्वात युवा आयर्नमॅन बनण्याची कामगिरी करुन दाखवली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या या आयर्नमॅन स्पर्धेत काल अभिषेक याने 13 तास 33 मिनिटांची वेळ नोंदवून आयर्नमॅन किताब पटकावला. 180 कि.मी. सायकलींग, 42.2 कि.मी. धावणे व 3.8 कि.मी. समुद्रात पोहोण्याचा या स्पर्धेत समावेश असतो व सर्व आव्हाने एकापाठोपाठ कोणतीही विश्रांती न घेता पूर्ण करायची असतात. या साठी स्पर्धकांच्या शारिरीक क्षमतेचा कस लागतो. जागतिक स्तरावरील व्यावसायिक स्पर्धक यात सहभागी होतात.

हेही वाचा: "योगी आदित्यनाथ यांची खुर्ची काढून घेण्याचे काम शेतकरी करतील"

अभिषेक हा बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात शिक्षण घेत असून गेल्या दीड वर्षांपासून त्याने आयर्नमॅनसाठी तयारी सुरु केली होती. बारामतीचे पहिले आयर्नमॅन सतीश ननवरे यांचा अभिषेक मुलगा. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याने हे खडतर आव्हान पार करण्याचा चंग बांधला होता. दीड वर्षांच्या मेहनतीच्या जोरावर त्याने काल या यशाला गवसणी घातली. या त्याच्या प्रयत्नामुळे देशातील ग्रामीण भागातील सर्वात युवा आयर्नमॅन बनण्याचे स्वप्न त्याने अखेर साकारले. दक्षिण आफ्रिकेतील प्रतिकूल वातावरण व समुद्रात पाच फूट उंचीच्या लाटा उसळत असतानाही त्याने जिद्दीने पोहून हे अंतर पार केले. भारतीय वातावरणातून परदेशी वातावरणात जाऊन तेथे तयारी करत त्याने 13 तास 33 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली.

सतीश ननवरे हेही या वेळी त्याच्यासमवेत उपस्थित होते. आयुष्यात यशस्वी होताना हेल्थ आणि वेल्थ या दोन्ही घटकांचा समन्वय साधला गेला पाहिजे हा मूलमंत्र नजरेसमोर ठेवून अभिषेक याने ही स्पर्धा पूर्ण केली. अठराव्या वर्षी अभिषेक हा एक व्यावसायिक असून त्याची स्वताःची सायकल ट्रेडींगची कंपनी आहे. सायकलींगला प्रोत्साहन मिळावे व युवकांची तब्येत अधिक सुदृढ राहावी या उद्देशाने तो अठराव्या वर्षी कार्यरत आहे हे त्याचे वेगळेपण आहे. सतीश ननवरे हेदेखील यापूर्वी तीन वेळा आयर्नमॅन झालेले आहेत.

loading image
go to top