बार्शीत ''बीएलओं''चे मानधन रखडले

बार्शीत ''बीएलओं''चे मानधन रखडले

Published on

बार्शीत बीएलओंचे मानधन तीन महिन्यांपासून रखडले
सुमारे २७० अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोबदला मिळेना

सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. ५ : बार्शी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काम केलेल्या सुमारे २७० केंद्रनिहाय अधिकाऱ्यांचे (बीएलओ) तसेच इतर कर्मचाऱ्यांचे मानधन तीन महिने उलटूनही अदा झाले नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे. बार्शी नगरपरिषद निवडणूक डिसेंबर २०२५ मध्ये पार पडली. निवडणुकीनंतर बराच कालावधी लोटूनही प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांची बिले अदा करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

निवडणुकीपूर्वी प्रभागनिहाय मतदार यादीची पडताळणी करणे, मतदारांची नोंद तपासणे, दुबार किंवा तिबार नोंदी रद्द करणे तसेच निवडणुकीसंदर्भातील विविध कामे या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पार पाडली. कडाक्याच्या थंडीतही त्यांनी आपले कर्तव्य बजावले. या प्रक्रियेत महिला शिक्षकांची संख्याही लक्षणीय होती. मात्र एवढे काम करूनही तीन महिने उलटून गेले तरी मानधन मिळालेले नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ‘याबाबत आम्हाला माहिती नाही,’ असेच उत्तर दिले जात असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या माध्यमातून अद्याप कोणत्याही कर्मचाऱ्याला मानधन अदा करण्यात आलेले नसल्याने नाराजी वाढत आहे. ‘निवडणूक काळात कडाक्याच्या थंडीतही आम्ही जबाबदारीने काम केले. मात्र वेळेवर मानधन मिळत नसेल तर पुढील वेळी काम कसे करायचे?’ अशी प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.

कोट
- बीएलओसारखे कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांची बिले कशामुळे दिली गेली नाहीत ते पाहावे लागेल, आठ दिवसांत सर्वांची बिले अदा केली जातील.
- तैमुर मुलाणी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, बार्शी

Marathi News Esakal
www.esakal.com