बार्शी नगर परिषदेचा ६९८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

बार्शी नगर परिषदेचा ६९८ कोटींचा अर्थसंकल्प सादर
Published on

BAR26B13082
बार्शी : अर्थसंकल्पावर बोलताना नगराध्यक्षा तेजस्विनी कथले.

बार्शी नगरपरिषदेचा ६९८ कोटींचा अर्थसंकल्प सादर
सभागृहात सत्ताधारी, विरोधकांत गदारोळ; आकडे फुगवून नोंदविल्याचा विरोधकांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. २७ : बार्शी नगर परिषदेचा २०२५-२६ चा सुधारित आणि २०२६-२७ चा प्रस्तावित ६९८ कोटी १२ लाख १३ हजार १४७ रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून तो सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांचे अभिभाषण झाले.
नगरपरिषदेच्या कै. भाऊसाहेब झाडबुके सभागृहात झालेल्या या अर्थसंकल्पीय सभेत विरोधी नगरसेवक कृष्णराज बारबोले यांनी, कोणतेही आर्थिक नियोजन नसलेला हा अर्थसंकल्प आहे, असे मत व्यक्त केले. तसेच शहरात कॉम्प्लेक्स बांधले; परंतु त्यांची निगा राखली जात नाही. भुयारी गटारीचे काम ७० टक्के पूर्ण झाले असताना गाळ काढण्याची तरतूद पुन्हा कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. त्यावर सत्ताधारी नगरसेवक संदेश काकडे, विजय चव्हाण, रोहित पाटील, संतोष बारंगुळे, दीपक राऊत, अमोल चव्हाण यांनी त्यांना रोखले. यावेळी बारबोले म्हणाले, माझे भाषण झाल्यानंतर तुम्ही बोला. मात्र सत्ताधाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे खोटा आरोप करू नका; कोणतेही आकडे फुगवले नाहीत, असे त्यांना सुनावले. यावेळी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये गदारोळ उडाला.
विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे म्हणाले, अधिकारी वर्ग सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांची दिशाभूल करत आहेत का?. कारण मागील वर्षाची भांडवली जमा १४१ कोटी ८३ लाख २२ हजार १४९ असताना या वर्षीची आरंभीची शिल्लक १३३ कोटी ७३ लाख २५ हजार ९९३ एवढी कशी राहू शकते? त्यामुळे या अर्थसंकल्पात काही ठिकाणी निश्चितच आकडे फुगवण्यात आल्याचा संशय निर्माण होतो. या आकडेवारीची लेखा विभागाने व्यवस्थित पडताळणी करून त्यात दुरुस्ती करावी, अशी सूचना अक्कलकोटे यांनी केली. तसेच शहराच्या विकासात महत्त्वाचा भाग असलेल्या ठेकेदारांची देय बिले यांचा उल्लेख का नाही, असा सवालही त्यांनी केला.
अर्थसंकल्पात शासनाकडून प्राप्त होणारे विविध प्रकारचे अनुदानित, अंशदानी तसेच विविध योजनांतर्गत कर्ज स्वरूपातील अर्थसाहाय्य आदींमधून ४९८ कोटी ७१ लाख ४२ हजार रुपये भांडवली जमेस धरून २०२६-२७ मध्ये एकूण ५१२ कोटी ८६ लाख ४२ हजार ४०४ रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. प्रारंभिक शिल्लक धरता एकूण ६९८ कोटी १२ लाख १३ हजार १४७ रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सत्ताधारी संदेश काकडे, विजय चव्हाण, रोहित पाटील, संतोष बारंगुळे, दीपक राऊत, अमोल चव्हाण, कांचन मोहिते यांनी चर्चेत सहभाग घेतला. तर विरोधी गटाकडून नागेश अक्कलकोटे, कृष्णराज बारबोले, अनिकेत कारंडे, सायरा मुल्ला, विद्या बंगाळे, आकाश राऊत यांनी चर्चेत सहभाग घेतला. दुपारी १ वाजता सुरू झालेली सभा दुपारी ४.१५ वाजता संपली. नगरसेवकांच्या प्रश्नांना करअधिकारी विठ्ठल पाटोळे आणि जलदाय अभियंता अजय होनखांबे यांनी उत्तरे दिली.
सभागृहात विरोधी नगरसेवक ज्योतिर्लिंग कसबे आणि विद्या बंगाळे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेतून ११ कोटींची तरतूद करण्यात आली असून, हा खर्च त्याच ठिकाणी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. महसुली खर्चाअंतर्गत कर्मचारी वेतनश्रेणी, सेवानिवृत्त कर्मचारी देयके, बालवाडी, ताई-दायी अंशदान तसेच नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळास अंशदान व इतर आस्थापना खर्चासाठी ३८ कोटी २० लाख ५२ हजार २९७ रुपये, प्रशासकीय व कार्यालयीन खर्चासाठी ३ कोटी ५ लाख रुपये, तर इमारती दुरुस्ती व परीक्षणासाठी १७ कोटी २४ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

चौकट :
मराठी दिनाचा प्रशासनाला विसर
अर्थसंकल्पीय सभा मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी असल्याने सभेच्या शेवटी राष्ट्रगीतानंतर महाराष्ट्र गीत लावले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र महाराष्ट्र गीत न लावल्याने सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.

चौकट :
स्व. अजित पवारांचाही पुतळा बसवा
बार्शी शहरातील शंकेश्वर बागेत अनेक पुतळ्यांसाठी चबुतरे उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासोबत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचाही पुतळा उभारावा, अशी जोरदार मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com