बार्शीच्या नव्या पाणी पुरवठ्याला ''न्हाई'' चा अडसर

बार्शीच्या नव्या पाणी पुरवठ्याला ''न्हाई'' चा अडसर

Published on

बार्शीच्या पाणीपुरवठा योजनेला ‘एनएचएआय’चा अडसर
२९६.८४ कोटींची योजना अंतिम टप्प्यात; केवळ २२ कि.मी.ची जलवाहिनी रखडली
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. ६ : बार्शी नगरपरिषदेच्या ‘अमृत-२’ योजनेअंतर्गत २९६.८४ कोटी रुपयांच्या उजनी ते बार्शी नव्या पाणीपुरवठा योजनेला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. मागील दीड वर्षात या योजनेचे काम वेगाने सुरू असून, बहुतांश काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) दिरंगाईमुळे ही योजना एप्रिल- मेऐवजी जून- जुलैमध्ये सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या योजनेअंतर्गत बार्शी ते कुर्डुवाडी दरम्यानची सुमारे ३५ किलोमीटर जलवाहिनी पूर्ण झाली आहे. तसेच कंदर (ता. करमाळा) येथे जॅकवेलचे कामही पूर्ण झाले आहे. परंतु सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कुर्डुवाडी ते टेंभुर्णी आणि टेंभुर्णी ते कंदर या सुमारे २२ किलोमीटरच्या जलवाहिनीचे काम रखडले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूचनेनुसार रस्त्यापासून १२ मीटर अंतरानंतर जलवाहिनी टाकावी लागणार आहे. मात्र त्या परिसरात शेती असल्याने शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. महामार्गासाठी पूर्वी केलेल्या भूसंपादनाचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठीही जागा देण्यास अनुकूलता दाखवत नसल्याने नगरपरिषदेपुढे अडचण निर्माण झाली आहे.
सध्या बार्शी शहराला दररोज सुमारे ४ कोटी लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, सध्या तीन-चार दिवसांआड केवळ २ कोटी २० लाख लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात एकूण ३०० हातपंप असून त्यापैकी २३० कार्यरत आहेत, तर सुमारे ७० नादुरुस्त आहेत. मागील वर्षी शहरातील विविध भागांत १६० विंधन विहिरी खोदून पाणीटंचाई कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच नगरपरिषदेच्या २० विहिरी आणि चांदणी तलावातूनही शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.
सध्या दोन जलशुद्धीकरण केंद्रांमधून अनुक्रमे १ कोटी ९० लाख लिटर आणि ८५ लाख लिटर पाणी शुद्ध केले जात आहे. याशिवाय आणखी एक ८५ लाख लिटर क्षमतेचे शुद्धीकरण केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जलदाय अभियंता अजय होनखांबे यांनी दिली. राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण झाल्यास उजनी-बार्शी नवी पाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
---
कोट
सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित आहे. बार्शीची जलवाहिनी रस्त्याच्या खाली जाऊ नये म्हणून ती १२ मीटर अंतरानंतर टाकण्याची अट आहे. या कामासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.
- परमेश्वर सुतार, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर
---
कोट
BAR26B13122
बार्शीच्या नवीन जलवाहिनीचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. चौपदरी रस्त्यामुळे थोडा अडथळा निर्माण झाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नवी पाणीपुरवठा योजना सुरू करता येईल. मात्र, उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई भासू नये याची खबरदारी घेतली आहे.
- अजय होनखांबे, जलदाय अभियंता, बार्शी नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com