

बावडा, ता. १७ : बावडा परिसरातील शेतकरी निसर्ग, शासन, महावितरण आणि आता वाढत्या चोऱ्यांमुळे त्रस्त झाला आहे. मागील महिनाभरात बावडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये केबल, मोटार, स्टार्टर, ऑटो, सोलर पॅनल, बॅटरी यांसह शेती साहित्य मोठ्या प्रमाणात चोरीला गेले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊनही पोलिस ठाण्यात दाखल तक्रारींची संख्या अत्यल्प असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. चोरीची तक्रार दाखल करून घेण्याबाबत टाळाटाळ का केली जाते? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
शेतकऱ्यांच्या शेती साहित्याचा चोरीला गेलेला माल परत मिळावा, तक्रारी तत्काळ दाखल करून घेतल्या जाव्यात, चोऱ्यांचा सखोल तपास व्हावा आणि चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
काही शेतकऱ्यांकडून चोरीला गेलेल्या साहित्याची जीएसटीची बिले मागितली जात असल्याचे सांगण्यात येते. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी वर्षानुवर्षे वापरत असलेल्या मोटारी, केबल किंवा इतर साहित्याची बिले जतन करून ठेवत नाहीत. त्यामुळे बिल नसल्याने तक्रारच नोंदवली जात नसेल तर हा गंभीर प्रश्न आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे व माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे या गोष्टीची तक्रार करून सुद्धा त्यांच्याकडूनही काणाडोळा होतोय, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
चोरीचा माल भंगारात विकला जात असल्याची चर्चा असून तो कोण खरेदी करतो आणि त्याची विल्हेवाट कुठे लावली जाते, याची चौकशीची मागणी जोर धरत आहे.
चोरीनंतर तुटलेल्या केबलमुळे धोका
चोरीनंतर तुटलेल्या केबल, उघडे पॅनल बॉक्स व विद्युत वायरी यामुळे शेतकरी आणि जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. बावडा गावातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी गेल्या सात-आठ वर्षांपासून केली जात आहे. ग्रामसभा व मासिक बैठकीत ठराव होऊनही अद्याप त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याने प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.