वाई:-बावधनमध्ये सनई व डफडे वाजविण्याची दीडशे वर्षाची परंपरा. किसन कांबळे व सहकाऱ्यांनी जपला वारसा.

वाई:-बावधनमध्ये सनई व डफडे वाजविण्याची दीडशे वर्षाची परंपरा. किसन कांबळे व सहकाऱ्यांनी जपला वारसा.

Published on

बावधनमध्ये १५० वर्षांची सनई-डफड्यांची परंपरा

बगाड यात्रा ठरते आकर्षण; कांबळे कुटुंबाने जपला सांस्कृतिक वारसा

वाई, ता. ५ : तालुक्यातील बावधन गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची वार्षिक यात्रा यंदा रंगपंचमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या पारंपरिक बगाड मिरवणुकीत सनई आणि डफड्यांच्या निनादाने संपूर्ण गाव दुमदुमून जाते. विशेष म्हणजे ही परंपरा गेली सुमारे १५० वर्षे अखंडपणे सुरू असून, कांबळे घराण्याने हा सांस्कृतिक वारसा आजही जपून ठेवला आहे.

बावधन येथील बगाड यात्रा राज्यभर प्रसिद्ध मानली जाते. यात्रेदरम्यान निघणारा छबिना, तसेच श्रावण महिन्यात दर सोमवारी निघणारी देवाची पालखी, कालभैरवनाथ, जोतिबा आणि जन्नीमाता आदी देवदेवतांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सनई व डफडे वाजविण्याचा मान किसन कांबळे यांच्या घराण्याला मिळतो.
या परंपरेची सुरुवात त्यांचे आजोबा संभाजी मार्तंड कांबळे यांनी केली होती. त्यानंतर वडील शंकर कांबळे यांनीही सनई आणि डफडे वाजवत ही सेवा पुढे चालू ठेवली. ग्रामदेवतेची सेवा म्हणून त्यांनी ही परंपरा जपली. आज किसन कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा वारसा पुढे नेला असून, आता या घराण्याची तिसरी पिढीही या कलेत सहभागी होत आहे. मुलगा तानाजी व नातू शिवकुमार कांबळे पुढील वारसा चालवत आहेत. त्यामुळे ही परंपरा पुढील काळातही टिकून राहणार असल्याचे चित्र आहे.

वाईपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेले बावधन गाव सामाजिक व राजकीयदृष्ट्या तालुक्यात महत्त्वाचे मानले जाते. गावातील सर्व समाजातील लोकांमध्ये असलेली एकी, भाविकता, चिकाटी आणि शेतीतील प्रयोगशीलता ही गावाची ओळख आहे. धार्मिक व आध्यात्मिक परंपरा जपत गावातील सण-उत्सवांमध्ये लगतच्या वाडी-वस्तीतील लोकांनाही सहभागी करून घेण्याची परंपरा येथे पाहायला मिळते. गावाजवळील सोनजाई डोंगराच्या कपारीत पांडवकालीन हीनयान काळातील बौद्ध लेणी तसेच भैरवनाथाचे मंदिर आहे. याशिवाय सुंदराबाई, सटवाई बुवासाहेब, जन्नीमाता, जोतिबा, चोपदाई, धुळोबा, विरोबा, खंडोबा, मारुती आणि काळूबाई अशी विविध देवतांची मंदिरे गावात व डोंगरपायथ्याशी विखुरलेली आहेत. या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सनई-डफड्यांचा निनाद परंपरेने घुमत असतो.

कोट
आमच्या घराण्यात तीन पिढ्यांपासून ही सेवा सुरू आहे. देवाची सेवा म्हणून आम्ही सनई-डफडे वाजवतो. गावकऱ्यांचा आणि देवाचा आशीर्वाद असल्यामुळे ही परंपरा आजही टिकून आहे. आता आमच्या पुढच्या पिढीनेही ही कला आत्मसात केली आहे, त्यामुळे हा वारसा पुढेही जपला जाईल.
- किसन कांबळे
कलाकार

07661
बावधन : सनई व डफडे वाजविण्याची परंपरा जपणारी कांबळे कुटुंबीयांची नवीन पिढी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com