
‘पुरुष वेश्या’ मराठी कादंबरीचा नायक होणे क्रांतिकारी - श्रीपाल सबनीस
पुणे : ‘‘आंबेडकरी साहित्य म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेला शिव्या घालणे नाही, तर त्यापलीकडे स्त्रीवादी प्रश्न, स्त्रीशी निगडित पुरुषाचे प्रश्न, सन्मानाने जगण्याचे हक्क अशा कितीतरी गोष्टी आंबेडकरी साहित्यात असणे गरजेचे आहे. लैंगिकतेवर भाष्य करणारे साहित्य मराठी साहित्यात अभावाने दिसते. असे नाजूक विषय हाताळणे आणि ‘पुरुष वेश्या’ हा मराठी कादंबरीचा नायक होणे हे क्रांतिकारी आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
फोरसाईट फाउंडेशन आणि चेतक बुक्स यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी खरात यांच्या ‘जिगोलो’ कादंबरीचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, डॉ. दिनकर खरात, कुणाल हजारी, सुधीर भोंगळे आदी उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, ‘डॉ. खरात यांची कादंबरी विस्फोटक, स्त्री-पुरुषांच्या सेक्स आणि संवादाचा गुंता आहे. न बोलला जाणारा, चर्चेत न येणारा प्रश्न आहे. सांस्कृतिक दडपण, नीतिमत्ता यात अडकून पडलेल्या स्त्रीचे दुःख समोर येत नाही. पुरुष वेश्या सर्वत्र असून, ते चांगले की वाईट हे लेखिका सांगत नाही. वास्तव मांडण्याचा प्रयत्न आहे.’’
पवार म्हणाल्या, ‘‘जागतिकीकरणाने जग पुढे गेले असले, तरी अनेक नवे प्रश्न उद्भवले आहेत पुरुष वेश्या हा विषय साहित्यात कदाचित पहिल्यांदाच येत असावा. पैशाने समाधान विकत घेता येत नाही, हेच या कादंबरीतून समजते.’’
डॉ. खरात म्हणाल्या, ‘‘स्त्रीच्या वेदना हजारो काळापासून खूप मोठ्या होत्या. पण हा विषय ठरवून घेतला नाही. जगण्याची जीवनाची अगतिकता, जीवन एवढे खोल असते हे तेव्हा जाणवले. अनेक राष्ट्रांमध्ये ‘जिगोलो’ हा नवीन भाग नाही. मनातला सुसंस्कृतपणा कायम असतो. पण अपरिहार्यता त्यांना तिथे आणते.’’
Web Title: Becoming The Protagonist Of Marathi Novel Purush Vesya Is Revolutionary
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..