कोरोना काळातील प्रामाणिक कष्टाचे फळ मिळाले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

आज लस घेताना हे कष्ट सार्थकी लागले आहे. आज आमचाच आम्हाला अभिमान वाटतोय, अशी भावनिक प्रतिक्रिया औंध जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत असलेले शशिकांत लोहार आणि अविनाश गावडे यांनी दिली. आज लसीकरणानंतर सर्वच लाभार्थ्यांची प्रामाणिक कष्टाचे फळ मिळाल्याची सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. 

पुणे : कोरोनाच्या प्रसाराला पुण्यातूनच सुरवात झाली. तेव्हापासून सर्वांच्याच मनात कोरोनाबद्दल थोडीफार भीती होतीच. रुग्णांची वाढती संख्या, लॉकडाउनमध्ये पुण्यातील निर्मनुष्य रस्ते, एकटे पडणारे रुग्ण, नातेवाईकांविना होणारे अंत्यविधी, सगळं काही या डोळ्यांनी बघितले. आपल्यामुळे कुटुंबातील लोकांना कोरोना होईल, ही भीती मनात असतानाही. हृदयावर दगड ठेवून प्रामाणिकपणे गेली नऊ महिने काम केले.

आज लस घेताना हे कष्ट सार्थकी लागले आहे. आज आमचाच आम्हाला अभिमान वाटतोय, अशी भावनिक प्रतिक्रिया औंध जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत असलेले शशिकांत लोहार आणि अविनाश गावडे यांनी दिली. आज लसीकरणानंतर सर्वच लाभार्थ्यांची प्रामाणिक कष्टाचे फळ मिळाल्याची सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्भोधनानंतर देशभरात लसीकरणाला सुरवात झाली. शहरातील लसीकरण केंद्रांवर आज रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. लसीकरणाचे कक्षही सजविण्यात आले होते. आरोग्य कर्मचारी, अधिकारी, राजकीय नेते, माध्यमांचे प्रतिनिधी आदींच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात आज लसीकरण झाले. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थ्यांचे लसीकरण निश्‍चित करण्यात आले होते. त्यासंबंधी त्यांना कोविन ऍप, मॅसेज आणि प्रत्यक्ष फोन करूनही बोलविण्यात आले होते. सकाळी साडेदहावाजताच पंतप्रधानांच्या संबोधनाला बहुतेक लाभार्थी आणि अधिकारी उपस्थित होते. लसीकरणकक्ष जणू चैतन्यानेच भारावून गेला होता. आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनत असल्याने सर्वांचाच उत्साह वाखाणण्याजोगा होता. लसीकरण झाल्यानंतर निरीक्षण कक्षात सुमारे अर्धा तास थांबलेले लाभार्थी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या कामावर परतत होते. कोणी ऍप्रॉन घालून ऑपरेशन थिएटरमध्ये, कोणी इतर रुग्णांना तपासायला, तर कोणी रुग्णांना गावाकडे परत सोडण्यासाठी परतले. कोरोना लसीकरणाचा पहिला दिवस सर्वच केंद्रांवर उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. 

''कोविड आणि नॉन कोविड वॉर्डमध्ये आमची आळीपाळीने ड्यूटी असते. त्यामुळे कोरोनाच्या लसीबद्दल प्रचंड उत्सुकता होती. जगभरातील लसीच्या संशोधनावर आम्ही लक्ष ठेवून होतो. आज सकाळीच लसीकरण्याच्या लाभार्थ्यांमध्ये माझे नाव असल्याचे कळाले. लस घेतल्यानंतर माझ्या मनात समाधानाची भावना असून, अजून कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाही.''
- डॉ. नितीन उगले, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल. 

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beneficiaries feelings after Corona vaccination begins in Pune Corona