मुळशीतील लाभार्थी नेत्यांना गावातच दणका

मुळशीतील लाभार्थी नेत्यांना गावातच दणका

बंडू दातीर : सकाळ वृत्तसेवा
पौड, ता. ६ : खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयी चौकारात मुळशी तालुक्याने ९९४१ मतांचे मताधिक्य दिले. तालुक्यात एका बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील स्थानिक नेत्यांची फौज अजित पवार यांच्या पाठीशी उभी होती. परंतु, या नेत्यांना आपल्याच गावात सुनेत्रा पवार यांना आघाडी देण्यात सपशेल अपयश आले. तर, दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि कॉंग्रेसने पाळलेला आघाडी धर्म आणि मतदारांची शरद पवार यांच्यावरील निष्ठेमुळे सुप्रिया सुळे यांना मागील दोन निवडणुकांपेक्षा सर्वांत जास्त मताधिक्य मिळाले. काही ठिकाणी पक्षातील स्थानिक नेतृत्वाला विरोध, ज्यांच्यामुळे शत्रुत्व पत्करले तेच गळ्यात गळा घालून फिरत असल्याचा राग, दुसऱ्याला श्रेय जाऊ नये म्हणून घेतलेली सावध भूमिका, या सर्वांचा मोठा फटका सुनेत्रा पवार यांना बसला.
त्यामुळे एका बाजूला स्थानिक नेत्यांची मोठी फौज दादांकडे गेल्याने कॉंटे की टक्कर अशा लढतीची अपेक्षा होती. परंतु, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आणि कॉंग्रेसने पाळलेला आघाडी धर्म, कार्यकर्त्यांनी थेट जनतेत जाऊन राबविलेली संयमी प्रचार यंत्रणा, सोशल मिडीयाचा केलेला पुरेपूर वापर, यामुळे सुळे आघाडीवर राहिल्या. तर दुसरीकडे लाभाची पदे टिकविण्यासाठी, चमकोगिरीसाठी, भविष्यातील स्वार्थासाठी अजित पवार यांच्याकडे गेलेल्या स्थानिक नेत्यांना आपली जागा दाखवून देण्यासाठी मतदारांनी सुळे यांना पसंती दिली.
पौड गणात सुळे यांना ९४०३ तर पवार यांना ५३६२ मते मिळाली. या गणातील अमित कंधारे आणि रवींद्र कंधारे यांना अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीचे संचालक केले होते. दोघांचे एकमेकांशी पटत नाही. परंतु, निवडणुकीच्या निमित्ताने दोघांनी न बोलता एकमेकांशी जुळवून घेतले. परंतु, त्यांच्याच कोंढावळे गावात सुळे यांना ८८ मतांची आघाडी मिळाली. जिल्हा दूध संघाचे संचालक असलेले कालिदास गोपालघरे यांच्याही जामगावमध्ये सुळे यांना १२६ मते जास्त पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) तालुकाध्यक्ष अंकुश मोरे यांच्या निवे गावातून सुळे यांनी ८० मतांची आघाडी घेतली. शरद पवार यांच्यासोबत राहिलेल्या पंचायत समितीच्या माजी सभापती कोमल वाशिवले यांच्या बार्पे गावात पवार यांना ३६; तर सुळे यांना २२२ मते मिळाली.

कासारआंबोली गण म्हणजे कोळवण खोरे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी सुळे यांना ८६१८; तर पवार यांना ४६१४ मते मिळाली. विशेष म्हणजे या गणातील वाळेण वगळता सर्व गावांत सुळे यांचा वरचष्मा आहे. शिवसेनेचे (ठाकरे) तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या हाडशीत पवार यांना ७७; तर सुळे यांना ५१२ मते मिळाली. माउली डफळ यांच्या काशिगमध्येही सुळे यांनी मोठे मताधिक्य घेतले. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा महिला संघटक स्वाती ढमाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विलास अमराळे, अजित पवार यांच्या पक्षाचे सचिन अमराळे यांच्या अंबडवेटमध्ये सुळे यांना ४७६ चे मताधिक्य आहे. कासारआंबोलीतही सुळेच आघाडीवर राहिल्या.
पिरंगुट गणात सुळे यांना ८६२६; तर पवार यांना ५४३५ मते मिळाली. महादेव कोंढरे यांच्या कोंढूर गावामध्ये पवार यांना ३२ तर सुळेंना ६२७ मते मिळाली. पिरंगुटच्या सात बुथवर सुळे पुढे राहिल्या. माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या मुठ्यात सुळे यांना १०४ मतांची आघाडी घेतली. या गणातील बहुतांश गावात सुळे यांचा वरचष्मा आहे.

बावधन गणात
बावधन गणात मात्र सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळाली. त्यांना १०३३२ तर सुळे यांना ८६७० मते मिळाली. राजेंद्र हगवणे यांच्या भुकूममध्ये सुनेत्रा पवार यांना मागे टाकत सुळे यांनी १९८ मतांची आघाडी घेतली. शांताराम इंगवले, दगडूकाका करंजावणे, शिवसेनेचे (शिंदे) तालुकाप्रमुख दीपक करंजावणे यांच्या भूगावमध्ये सुळे यांना २२२२; तर पवार यांना १५१२ मते मिळाली. शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे आणि सुनील चांदेरे यांच्या सूसमध्ये पवार यांना ३१५९ आणि सुळे यांना १७०६ मते मिळाली. सविता दगडे यांच्या बावधनला पवार यांना बहुमत मिळाले.
माण गणात सुळे यांना ८५६० तर पवार यांना ७००३ मते मिळाली. माजी सभापती पांडुरंग ओझरकर यांच्या माणमध्ये पवार यांना २९८४; तर सुळे यांना २०६५ मते मिळाली. शिवसेने (ठाकरे) जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांच्या चांदे गावात सुळे यांना ४११; तर
पवार यांना १२० मते मिळाली. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे यांच्या घोटावड्यात सुळे यांना आघाडी मिळाली. बाबाजी शेळके यांच्या पिंपळोलीत सुळे यांना ३६६ आणि पवार यांना १९२ मते
मिळाली.
हिंजवडी गणात पवार यांना १११६८ तर सुळे यांना १००७३ मते मिळाली. हिंजवडी, मारूंजी, म्हाळुंगे, ताथवडे या गावात सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळाली.

मुळशीतील मतांची आकडेवारी
सुप्रिया सुळे यांना मते- ५३९७१
सुनेत्रा पवार यांना मते- ४३९०४
सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य- ९९४१

- पौड, कासारआंबोली, पिरंगुट गणात सुप्रिया सुळे यांना मताधिक्य
- माण, हिंजवडी, बावधन गणात सुनेत्रा पवार यांना मताधिक्य
- २०१४च्या निवडणुकीत तालुक्यात सुळे ३०८ मतांनी पिछाडीवर होत्या.
- २०१९च्या निवडणुकीत तालुक्यात सुळे यांना १३७७ मतांची आघाडी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com