

मिशाळ म्हातारा
अगदी अलीकडेच, पूर्वीचे न्हावी प्लॅस्टिक सर्जरी करायचे असं विधान कोसलाकार भालचंद्र नेमाडेंनी केलं आणि एकच गहजब माजला. नेमाडे चार-आठ महिन्यांतून अशी वादळी विधानं करतात आणि समाज माध्यमं खडबडून जागी होतात. नेमाडेंच्या भाषणातील अंश ऐकून कमालीच्या तीव्र प्रतिक्रिया देणारे, तिरकस लिहिणारे, कविता पाडणारे, देशीवादावर टीकेची झोड उठवणाऱ्यांनी. एकदा, फक्त एकदा ‘सोळा भाषणे’ वाचा. मग खुशाल या म्हाताऱ्याला उजव्या डाव्या पाटीखाली डाला. जमल्यास शंभराव्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करून टाका. लेखकानं आमच्या सोयीचं बोलावं आणि आम्हाला वाटतं तेच मांडावं या भ्रमातून आपण बाहेर पडलं पाहिजे. अन्यथा नेमाडे म्हणतात तसं, भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात मोनोकल्चरल दृष्टी बाळगली, तर आपला विनाश अटळ आहे.
नेमाडे हिंदू धर्मावर बोलताना जी परखड चिकित्सा करतात, ती अन्य कुणी अभावाने केली आहे. भारतीयत्व हे गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात एकाच जातिधर्माशी कधीच बांधलेलं नव्हतं. ते नेहमीच बहुसांस्कृतिक होतं, असं ते मानतात. मानत आले आहेत. असो. मात्र साहित्यातील नेमाडे आणि प्रत्यक्षातील नेमाडे यात फारसं अंतर नाही. नेमाडे त्यांच्या कोसला या कादंबरीसाठी ओळखले जातात... मात्र गेल्या दशकात आलेल्या हिंदूने खळबळ माजवली आहे.. खरेतर मी अनेकदा कोसला वाचली ही गोष्ट आता जुनी झाली आहे. मात्र, कोसलाच्या अंत्यंतिक प्रभावातून मला ''टिकास्वयंवर'' वाचावं लागलं. ते वाचल्यावर फिरून मला कोसला वाचणं भाग होतं. इतकं होऊनही कोसलावरचं कोसलाईतकंच सुंदर समीक्षेचं पुस्तक म्हणून बाबा भांड संपादित ‘कोसलाबद्दल’ हे वाचणंही ओघाने आलंच. दिलीप चित्र्यांनी कोसला झोडली आणि पुन्हा दहा बारा वर्षांनी खांद्यावर घेतली. कोसला गेली साठ वर्षे बुडवण्याचा प्रयत्न होऊनही तरली आहे, तुकोबाच्या गाथेसारखी. कारण ती नेमाडेंची गोष्टच नाही. पांडुरंग सांगवीकराची आहे. त्यानंतर आलेला चांगदेव हे नेमाडेंचंच लाईट वर्जन होतं हा आरोप होऊनही माझी पात्रं म्हणजे मी नाही,असं सांगूनही नेमाडेंना हिंदू कादंबरीचं नायकत्व मिळणं, हे आपल्याकडच्या किडलेल्या साहित्यव्यवहाराला धरूनच आहे.
लेखनात काल्पनिकता आली की सारवासारव करावी लागते, त्यामुळे मला दलित साहित्य अस्सल वाटतं असं नेमाडेच कुठंतरी म्हणतात मात्र कोत्तापल्ले कसबेंसारख्या विचारवंतांना आडव्या अक्षवाले नेमाडे बायस वाटतात. त्यातून ''देशीवाद समाज आणि साहित्य'' हा चिकित्साग्रंथ लिहावा लागतो. ते ओघाने वाचणं आलंच. त्यावर उतारा म्हणून अशोक बाबरांचं ''देशीवादाचे दुश्मन'' वाचावं लागतं. किंबहुना राजन गवसांच्या ''चांगदेवचातुष्ट्यासंबंधी'' अथवा नितीन वाघांच्या ''रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि द वर्ल्ड इज फ्लॕट'', सुशील धसकटेंची ''जोहार'' ही परिक्रमा पूर्ण करावी लागते. देशीवाद म्हणजे ग्रामीण असणं या गृहीतकाला दस्तूरखुद्द नेमाडेच छेद देतात. ग्रामीण साहित्य चळवळ फाट्यावर मारतात. सबब गावगाड्याबद्दल आणि तिथल्या कृषीजीवनाबद्दल, किंबहुना बलुतेदाराबद्दल त्यांना फारसं ममत्व असण्याचं कारण नसतं आणि त्यामुळेच त्यांना पुनरुज्जीवनवादी म्हणूनही लेबल लावता येत नाही.
पुढाऱ्यांना खोटं बोलावं लागतं पण लेखकाचं तसं नसतं. लेखकानं खरंच बोललं पाहिजे असं म्हणणारा हा मिशाळ म्हातारा, या गर्दीत वेगळा वाटू लागतो. हिंदूच्या मलपृष्ठावर मोदींच्या हस्ते जेव्हा हा म्हातारा सन्मान स्वीकारतो तेव्हा त्याच्यावर जहरी टीका होते हे व्यवहाराला धरूनच आहे; पण अगदी अलीकडे पेशव्यांबद्दल केलेल्या परखड विधानामुळं हिंदुत्ववाद्यांकडून तो जबरी ट्रोल होतो हे इथल्या व्यवस्थेला धरूनच आहे आणि या घटनेला एखादं वर्ष उलटतंय नं उलटतंय तोच आता डावे त्यांच्यावर तुटून पडले आहेत.. नेमाडेंना कुठल्याच पाटीखाली डालता येत नाही ही खरी अडचण आहे. म्हणून डावे उजवे दोन्ही त्यांना झोडतात. खंडेराव, इथल्या उन्मूलित भुतावळीत तू शिरू नको, सगळ्या वाटा पाय गिळायला आतुर असतात असं तो म्हणत असला, तरी तो ज्या वाटेने गेला तिथं पायवाटा तयार झाल्या. चालता चालता हाताच्या हजार बोटांनी चांगली माणसं तो मोजत राहिला.
नेमाडे हा माणूस निव्वळ कोसलात नाहीच आहे. तो त्याहून जास्त देखणीत आहे..त्याच्या साहित्य आणि समाजविषयक धारणा तपासायच्या असतील तर ''सोळा भाषणं'' वाचणं भाग आहे. ''सोळा भाषणं'' हे हिंदू वाचण्यापूर्वी मस्ट आहे. सोळा भाषणे हे माझं कोसलानंतर सर्वात आवडतं पुस्तक. ते वाचल्यानंतर जाणवलं, प्रोजेक्ट केलेला नेमाडे आणि मूळचा नेमाडे वेगळा आहे. गेल्या साठ वर्षांत मराठी साहित्याला ज्यानं वास्तवाची जमीन दिली आणि देशी अवकाश दिलं तो मिशाळ म्हातारा अडगळ म्हणून फेकून देण्याइतका सहज सोपा विषय नाही.
- नीलेश महिगावकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.