बाळासाहेब हळनोर लेख

बाळासाहेब हळनोर लेख
Published on: 

आव्‍हानांना संधी मानणारे कर्तृत्‍व

प्रकाशदूत बाळासाहेब हळनोर

जिद्दीला कष्टांची जोड आणि ध्येयाला दूरदृष्टीची साथ मिळाली, की सामान्य परिस्थितीतूनही असामान्य कर्तृत्व घडते. याचाच प्रत्यय देणारा प्रवास म्हणजे महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब भागवत हळनोर यांचा.
- शब्‍दांकन
प्रशांत घाडगे (सातारा)
.........................
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर या गावातून सुरू झालेली त्यांची वाटचाल आज ऊर्जाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानापर्यंत पोहोचली आहे. महावितरणमधील २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी अनुभव, आधुनिक तंत्रज्ञान आणि नियोजनाच्या बळावर सातारा जिल्ह्याच्या वीज व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. आव्हानांना संधी मानत ध्येयपूर्तीकडे त्‍यांनी केलेली वाटचाल निश्चितच प्रेरणादायी वाटते म्‍हणून...

जिद्दीचा प्रवास,
ऊर्जाविकासाचा ध्यास

शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका जिद्दी तरुणाने मेहनत, बुद्धिमत्ता आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर ऊर्जाक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवावा, ही प्रेरणादायी कहाणी म्हणजे अधीक्षक अभियंता बाळासाहेब भागवत हळनोर यांचा प्रवास. महाराष्ट्र राज्य वीज मंडळापासून महावितरणपर्यंतच्या २९ वर्षांच्या सेवेत त्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत कार्यक्षमतेला प्राधान्य दिले. केवळ वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यापुरती जबाबदारी मर्यादित न ठेवता दुर्गम भागातील वीज समस्या सोडविणे, ग्राहकाभिमुख सेवा आणि अपारंपरिक ऊर्जेच्या वापराला चालना देणे, अशा विविध आघाड्यांवर त्यांनी योगदान दिले. प्रशासकीय कौशल्य, संवेदनशील दृष्टिकोन आणि विकासाभिमुख विचारांची सांगड घालत त्यांनी ऊर्जा व्यवस्थेतील आव्हानांना सामोरे जाण्याचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यातून तंत्रज्ञान, नियोजन आणि जनसेवा यांचा प्रभावी संगम अनुभवायला मिळतो.

यशाची पायाभरणी

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर या छोट्याशा गावात बाळासाहेब हळनोर यांच्या आयुष्याचा पाया घातला गेला. वडील भागवत हळनोर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत, तर आई लक्ष्मीबाई यांनी संसाराला खंबीर साथ दिली. दोन मुले आणि दोन मुलींच्या कुटुंबात वाढलेले बाळासाहेब लहानपणापासूनच हुशार आणि अभ्यासू होते. त्यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे रयत शिक्षण संस्थेच्या कोल्‍हार भगवतीपूर येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्‍ये त्‍यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. आठवी ते दहावीचे शिक्षण प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये, तर अकरावी- बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण प्रवरानगर येथील पीव्हीपी कॉलेजमध्ये पूर्ण केले. अभियांत्रिकीचे ध्येय उराशी बाळगून त्यांनी १९८८ ते १९९२ या काळात परिश्रमपूर्वक अभ्यास केला आणि बीई पदवी मिळवली. याच शिक्षणाने त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीचा पाया रचला.

कारकिर्दीचा नवा अध्याय
अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर बाळासाहेब हळनोर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अध्यापन क्षेत्रातून केली. सलग तीन वर्षे अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम करताना त्यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान दिले, तसेच स्वतःचे विषयज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यही अधिक समृद्ध केले. अध्यापनाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी वीजक्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा मार्ग निवडला. ११ ऑगस्ट १९९७ रोजी तत्कालीन महाराष्ट्र राज्य वीज मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून ते सेवेत रुजू झाले. अहिल्यानगर सर्कलमधील शेवगाव येथे त्यांची पहिली नियुक्ती झाली. येथूनच वीजपुरवठा, तांत्रिक अडचणी आणि ग्राहकांच्या समस्या यांच्याशी थेट संबंध येणाऱ्या त्यांच्या क्षेत्रीय सेवेचा प्रारंभ झाला. ज्ञानदानातून मिळालेला अनुभव आणि अभियांत्रिकीचे तांत्रिक ज्ञान यांच्या बळावर त्यांनी ऊर्जाक्षेत्रातील प्रदीर्घ कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली.

अनुभवाचा प्रवास

महावितरणमधील सेवाकाळात बाळासाहेब हळनोर यांनी विविध ठिकाणी जबाबदाऱ्या सांभाळत कामाचा समृद्ध अनुभव मिळवला. शेवगावनंतर त्यांची बदली कोल्हापूर विभागातील मिरज येथे झाली. तेथे दोन महिने काम केल्यानंतर त्यांनी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे सेवा बजावली. त्यांच्या कार्यतत्परतेची दखल घेत तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मंचर या गावी त्यांची उपविभागीय अधिकारी म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली. २००३ मध्ये पुण्यात आल्यानंतर त्यांनी झोनल ऑफिस, एपीडीआरपी, बंडगार्डन डिव्हिजन आणि वाडिया उपविभाग येथे काम केले. वाडिया येथे असतानाच त्यांना उपकार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली. त्यानंतर दौंड येथे सहा महिने सेवा बजावून २००७ मध्ये ते विश्रांतवाडी येथे रुजू झाले. तेथे सलग सहा वर्षे त्यांनी निष्ठेने काम करून प्रामाणिकतेची चुणूक दाखविली.

वसई-विरारचा
वीजपुरवठा सुधारला

विश्रांतवाडीतील कामानंतर बाळासाहेब हळनोर यांना कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांच्याकडे वसई- विरारसारख्या विस्तीर्ण आणि आव्हानात्मक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. समुद्रकिनाऱ्यावरील दमट वातावरणामुळे वीज वितरण यंत्रणा खराब झाली होती. यंत्रणेवरील अतिरिक्त भार आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा ही मोठी आव्हाने होती. हळनोर यांनी नवीन उपकेंद्रांची उभारणी करून वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर मुंबई मुख्य कार्यालयातील पॉवर पर्चेस विभागात त्यांनी दोन वर्षे काम केले. वीज खरेदी आणि प्रशासकीय धोरणांचा अनुभव घेतल्यानंतर ते पुणे परिमंडलात कार्यकारी अभियंता (प्रशासन) म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी पाच वर्षे जबाबदारी सांभाळली. कोरोना संक्रमणाच्या कठीण काळात कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि ग्राहकांना अखंडित, दर्जेदार वीज सेवा देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

सातारा बनतोय स्वयंपूर्ण

कोळसा, पाणी आणि ॲटॉमिक ऊर्जा या पारंपरिक गोष्टी कधीतरी संपणार आहेत, हे ओळखून बाळासाहेब हळनोर यांनी ‘सौर ऊर्जा’ आणि ‘पवन ऊर्जा’ या ग्रीन एनर्जीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शासनाच्या योजना साताऱ्यात प्रभावीपणे राबवल्यामुळे आज सातारा जिल्हा ग्रीन एनर्जीमध्ये देशात अग्रेसर ठरत आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकूण ९६ उपकेंद्रे आहेत. यापैकी ३९ सबस्टेशन्सना १ ते १३ मेगावॅट क्षमतेचे सोलर प्लांट जोडण्यात आले आहेत. या माध्यमातून तब्बल २०८ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. शेतकऱ्यांना आता रात्रीऐवजी दिवसा आठ तास अखंडित वीज दिली जात आहे.
सातारा जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक सजग नागरिक सूर्यघर योजनेच्या माध्यमातून स्वतःची वीज स्वतः तयार करून ‘शून्य वीज बिल’चा अनुभव घेत आहेत. साताऱ्यात आतापर्यंत साडेतीन लाख (सुमारे ४० टक्के) स्मार्ट मीटर यशस्वीपणे बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना कोणतीही ॲव्हरेज बिले जात नाहीत. एक आदर्श वस्तुपाठ घालून देत, हळनोर यांनी साताऱ्यातील सर्व ९६ उपकेंद्रे, १३० शाखा कार्यालये, पाच विभागीय कार्यालये, २४ उपविभागीय कार्यालये आणि मुख्य सर्कल ऑफिस या सर्व इमारतींवर स्वतःची सोलर यंत्रणा सक्रिय केली आहे. महावितरणचा संपूर्ण कारभार आता सौरऊर्जेवर चालतो, ही साताऱ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

सौरऊर्जेतून साताऱ्याची
स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ ऊर्जेचा प्रभावी वापर करण्यावर अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांनी भर दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात सौरऊर्जेच्या विस्ताराला चालना मिळाली आहे. जिल्ह्यातील ९६ उपकेंद्रांपैकी ३९ उपकेंद्रांना सौर प्रकल्प जोडण्यात आले आहेत. त्यातून २०८ मेगावॅट वीजनिर्मिती होत असल्याची माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यास मदत होत आहे. ‘पीएम सूर्यघर’ योजनेतून दहा हजारांहून अधिक नागरिक स्वतःची वीज तयार करत आहेत. जिल्ह्यात सुमारे चार लाखांहून अधिक स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. या उपक्रमांतून ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक वीजवापराला प्रोत्साहन मिळत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात २९० फिडर, पाच डिव्हिजन, २४ सबडिव्हिजन, १४० सेक्शन सुरू आहेत.

तब्बल २२५ कोटींचा महसूल

महसूल वसुली, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीच्या जोरावर सातारा जिल्ह्याने वीज वितरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातून सुमारे २२५ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. यामध्ये आठ लाख ६८ हजार ७३९ आरसीआय ग्राहकांकडून सुमारे ११० कोटी रुपये, दोन लाख १७ हजार कृषिपंप ग्राहकांकडून ३० कोटी रुपये, तर उच्चदाब वीज प्रकल्पातून १०० ते ११० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. महसूल वसुलीसोबतच वीजपुरवठ्याची गुणवत्ता सुधारणे, तांत्रिक अडचणी सोडविणे आणि प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम करण्यावर हळनोर यांनी भर दिला. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यशैलीमुळे जिल्ह्याच्या कामगिरीला बळ मिळाले असून, साताऱ्याच्या या यशाची ऊर्जाक्षेत्रात विशेष दखल घेतली जात आहे.

पुरस्कारांतून पोचपावती

कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमता आणि आव्हानात्मक परिस्थितीतही उद्दिष्ट साध्य करण्याची जिद्द यांची दखल घेत बाळासाहेब हळनोर यांना महावितरण आणि शासनाकडून विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मंचर येथे कृषिपंपांच्या थकबाकीची शंभर टक्के वसुली करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कामगिरीबद्दल त्यांना ‘कृषी संजीवनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वसई- विरार येथे कार्यकारी अभियंता म्हणून जबाबदारी सांभाळताना प्रतिकूल परिस्थितीत वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विविध ठिकाणी काम करताना त्यांनी दाखवलेली निर्णयक्षमता, प्रशासकीय कौशल्य आणि कामाप्रती असलेली निष्ठा त्यांच्या कारकिर्दीची वैशिष्ट्ये ठरली. या पुरस्कारांमधून त्यांच्या कार्याची गुणवत्ता आणि सेवाभाव अधोरेखित होतो.

मान्याचीवाडीचा
देशभर लौकिक

अपारंपरिक ऊर्जेचा प्रभावी वापर आणि पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने वाटचाल करत पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीने देशात वेगळी ओळख निर्माण केली. देशातील पहिले ‘सौरग्राम’ होण्याचा बहुमान मिळाल्याने या गावाचे नाव राष्ट्रीयस्तरावर पोहोचले आणि सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात सौरऊर्जेच्या वापराला चालना देण्यावर विशेष भर देण्यात आला. पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या प्रयत्नांना मान्याचीवाडीसारख्या उपक्रमांमुळे बळ मिळाले. ग्रामीण भागातही सौरऊर्जेच्या माध्यमातून विकासाची नवी दारे खुली होऊ शकतात, हे या गावाने दाखवून दिले.

जनसेवेचा अविस्मरणीय अनुभव

बाळासाहेब हळनोर यांच्‍या २९ वर्षांच्या सेवेत मनावर कायमची छाप उमटवणारा प्रसंग म्हणजे आदिवासी बांधवांच्या घरात पोहोचलेला प्रकाश..! मंचर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी आदिवासी भागातील विजेची गरज ओळखून तळेघर येथे ३३/११ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र सुरू केले. वर्षानुवर्षे अंधारात राहणाऱ्या कुटुंबांच्या घरात प्रकाश पोहोचल्यानंतर आनंदित झालेल्या ग्रामस्थांनी स्वतः बनविलेल्या हस्तकलेच्या वस्तू भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. हा क्षण त्यांच्या सेवाकार्यातील भावनिक आठवण ठरला. साताऱ्याच्या दुर्गम पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या गंभीर असते. वनक्षेत्रातील वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हळनोर यांनी नियोजनबद्ध उपाययोजनांवर भर दिला. वीजपुरवठा लवकर सुरळीत व्हावा, यासाठी विशेष कर्मचारी पथके तैनात ठेवण्याची व्यवस्था केली.

यशाच्या वाटेवर
सौभाग्‍यवतींची साथ

प्रदीर्घ सेवाप्रवासात यशाची शिखरे गाठताना कुटुंबाची साथ माणसाला मोठे बळ देते. अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांच्या कारकिर्दीत त्यांच्या पत्नी मनीषा हळनोर यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. १९९९ मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी पतीच्या सेवाकार्यातील चढ- उतार जवळून अनुभवले. १९९७ पासून महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या बाळासाहेबांच्‍या विविध जिल्ह्यांतील बदल्या, नव्या ठिकाणी स्थिरस्थावर होण्याची धावपळ आणि कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्या या काळात मनीषा यांनी कौटुंबिक आघाडी समर्थपणे सांभाळली. प्रत्येक टप्प्यावर पतीला मानसिक आधार देत त्यांनी त्यांच्या कार्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले. या सुखी संसारात २०२० मध्ये मुलगा राजनील याचे आगमन झाले. बाळासाहेब यांच्या व्यावसायिक यशामागे मनीषा यांची समजूतदार साथ, त्याग आणि कुटुंबाप्रती असलेली बांधिलकी यांचा मोलाचा वाटा आहे.

आयुष्यातील अनमोल क्षण

प्रत्येक शेतकरी वडिलांप्रमाणेच भागवत हळनोर यांचेही स्वप्न होते की, आपल्या मुलांनी मोठे होऊन समाजात मानाचे स्थान मिळवावे. मोठा मुलगा अभियंता झाल्यानंतर धाकट्या मुलाने डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. बाळासाहेब हळनोर डॉक्टर झाले नसले, तरी महावितरणमध्ये अधीक्षक अभियंता पदापर्यंत मजल मारत लाखो वीजग्राहकांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. आज ते या पदावर कार्यरत असताना वडील हयात नाहीत, याची खंत त्यांच्या मनात आहे. मात्र, कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली, तेव्हा वडिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि डोळ्यांत दिसलेला अभिमान हा त्यांच्या आयुष्यातील सर्वांत सुखद क्षण ठरला. वडिलांचे स्वप्न, त्यांचे संस्कार आणि त्यांनी दिलेली प्रेरणा आजही आपल्या कार्यातून जनसेवा करण्याची ऊर्जा देतात, अशी भावना बाळासाहेब हळनोर व्यक्त करतात.
...........

कर्मचारी सन्मान अन्‌
ग्राहक विश्वासाला प्राधान्य

महावितरणच्या कार्यक्षमतेचा खरा आधार कर्मचारी असून, त्यांच्या मेहनतीचा सन्मान करणे आवश्यक आहे, अशी भूमिका अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांची आहे. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या लाइनमनच्या योगदानाची दखल घेण्यासाठी ते ‘लाइनमन दिवस’ उत्साहाने साजरा करतात. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक, तर कामात कसूर करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई, अशी त्यांची कार्यपद्धती आहे. साताऱ्यातील महावितरण कार्यालयाला कॉर्पोरेट स्वरूप देतानाच ग्राहकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यावर त्यांचा भर आहे. ग्राहकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्या मते, ग्राहक आणि महावितरण यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के ग्राहक वेळेवर वीजबिल भरतात, ही या विश्वासाची सकारात्मक पावती मानली जाते.

नियोजित देखभाल-दुरुस्ती

वादळ, अतिवृष्टी, झाडे उन्मळून पडणे किंवा वीज खांबांचे नुकसान अशा नैसर्गिक संकटांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. या अडचणींचा ग्राहकांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांनी नियोजनबद्ध देखभाल-दुरुस्तीवर भर दिला आहे. सातारा जिल्ह्यात दर मंगळवारी नियोजित वीजखंडित कालावधीत वीज वाहिन्यांतील अडथळे दूर करणे, धोकादायक फांद्यांची छाटणी, ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती आणि वाहिन्यांची देखभाल केली जाते. कामाची पूर्वकल्पना ग्राहकांना एसएमएसद्वारे दिली जाते. त्यामुळे अचानक होणाऱ्या वीज खंडित घटनांचे प्रमाण कमी करण्यास मदत झाली आहे. सातारा सर्कलमधील पाच विभाग आणि ११ तालुक्यांमध्ये सुमारे दोन हजार ६०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून वीजवितरण व्यवस्था सक्षम ठेवण्यासोबतच ग्राहकांना अधिक विश्वासार्ह सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

साताऱ्याच्या वीजव्यवस्थेला
आधुनिकतेची नवी दिशा

सांगलीतील यशस्वी कार्यानंतर बाळासाहेब हळनोर यांची २७ जून २०२४ रोजी पदोन्नतीने सातारा येथे अधीक्षक अभियंता म्हणून नियुक्ती झाली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेचा अभ्यास करून भविष्यातील वाढत्या विजेची गरज लक्षात घेऊन पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर दिला. सातारा शहरातील पॉवर हाऊस आणि नवीन एमआयडीसी येथे प्रत्येकी २० एमव्हीए क्षमतेची दोन नवीन उपकेंद्रे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलिस लाइन परिसरातील उपकेंद्रही कार्यान्वित करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, खिंडवाडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महावितरणच्या सर्कल कार्यालय परिसरात नवीन उपकेंद्रे उभारण्याचे नियोजन आहे, तसेच सैनिक स्कूल आणि गोडोली येथेही उपकेंद्रे प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांमुळे वाढत्या वीज मागणीची पूर्तता करून साताऱ्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह करण्याचे उद्दिष्ट आहे.

रोहित्रांच्या समस्येवर
कायमस्वरूपी तोडगा

पुणे जिल्ह्यातील पाच वर्षांच्या प्रदीर्घ आणि आव्हानात्मक कार्यकाळानंतर बाळासाहेब हळनोर यांची सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे बदली झाली. येथे दर महिन्याला तब्बल ६० ते ७० रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) नादुरुस्त होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांना वारंवार वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. रोहित्रे वारंवार जळण्याच्या या समस्येमुळे शेतीच्या कामांवरही परिणाम होत होता. स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेल्या हळनोर यांना शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव होती. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी या समस्येकडे विशेष लक्ष दिले. केवळ तात्पुरती दुरुस्ती करण्याऐवजी रोहित्रे नादुरुस्त होण्यामागील तांत्रिक कारणांचा शोध घेतला.

कारभारात पारदर्शकता

महावितरणच्या विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज कमी होणार असून, घरबसल्या अनेक सेवांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. वीजजोडणी, बिलासंबंधी कामे आणि इतर ग्राहकसेवांसाठी ऑनलाइन सुविधांचा वापर करता येणार आहे. या डिजिटल प्रक्रियेमुळे कामकाजात सुसूत्रता येण्यासोबतच वेळेची बचत होईल. अर्जांची स्थिती जाणून घेणे आणि सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे, तसेच मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. ग्राहकांना जलद, सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याच्या दृष्टीने महावितरणचे ऑनलाइन सेवा व्यवस्थापन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
...........
सातारा जिल्ह्यात वीज वितरण आणि सौरऊर्जेच्या क्षेत्रात परिवर्तन घडविण्याची मोठी संधी मिळाली आहे. माझ्या २९ वर्षांच्या सेवाकाळात सातारा जिल्ह्यातील काम करण्याचा अनुभव हा सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय आहे. ग्राहकांचे सहकार्य आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या बळावर जिल्ह्याला ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न आहे. साताऱ्यात सुरू असलेली ही ऊर्जाक्रांती राज्यापुरती मर्यादित न राहता देशासाठी आदर्श ठरावी आणि साताऱ्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल व्हावे, हेच माझे ध्येय आहे.
- बाळासाहेब हळनोर,
अधीक्षक अभियंता (सातारा विभाग)
........

५८५२१
बाळासाहेब हळनोर
.....
५८५२२
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करताना बाळासाहेब हळनोर.
.........
५८५२३

सौभाग्यवती मनीषा व मुलगा राजनील यांच्यासमवेत बाळासाहेब हळनोर.
.........
५८५२४
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत योजनेतील तांबवे येथे साकारण्यात आलेल्या चार मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com