Water Crisis : उशाला धरण, पाण्यासाठी मरण; चाकणकरांची भिस्त खासगी टँकरवर

चाकण शहरात घरगुती व पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ.
bhama askhed dam
bhama askhed damsakal
Updated on

चाकण - जिल्ह्यातील मोठे व औद्योगिक वसाहत म्हणून राज्यात व जगभरात प्रसिद्ध असलेल्या चाकण शहरातील नागरिकांना घरगुती वापरासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर तसेच बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सहा ते सात महिने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

चाकण शहरात घरगुती व पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ अनेक गृहसोसायट्यांवर व इतर राहिवासी नागरिकांवर आली आहे. भामा आसखेड धरण उशाला असून चाकणकरांना पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे.

चाकण नगर परिषदेच्या हद्दीत तसेच शेजारील गावांना, वाड्या, वस्त्यांना गेल्या अनेक वर्षापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई मिटविण्यात नगरपरिषद व विविध गावच्या ग्रामपंचायतीना अपयश येत आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्याना व इतर रहिवासी लोकांना खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना, मुख्याधिकाऱ्यांना नगरपरिषद कार्यालयाला वारंवार भेटी दिल्यानंतरही अधिकारी कायमचा तोडगा काढू शकत नाही त्यामुळे रहिवासी संताप व्यक्त करत आहेत.

बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायाला मोठी तेजी

उन्हाळा कडक उन्हामुळे विहिरींचे पाणी आटले आहे. काही बोअरवेलला पाणी येत नाही तर काहींचे पाणी अत्यल्प आहे. त्यामुळे टँकर भरण्यासाठी पाणी मिळत नाही. एका टँकरला सहाशे ते एक हजार, बाराशे रुपये मोजावे लागतात. त्यामुळे वीस लिटरच्या बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायाला मोठी तेजी आली आहे.

नगरपरिषदेने तसेच तहसीलदाराने चाकणच्या पाणी समस्येकडे लक्ष देऊन खासगी टँकर भरण्यासाठी पॉइंट केले पाहिजेत जेणेकरून लोकांना कमी खर्चात कमी दरात पाणी मिळेल, असे नागरिकांचे व टँकर चालक, मालकांचे म्हणणे आहे.

चाकण शहराला पाणी केव्हा मिळणार?

भामा- आसखेड धरण चाकण शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. धरणातून चाकण शहरासाठी सुधारित पाणीपुरवठा योजना होत आहे. परंतु ती योजना केव्हा होणार? चाकण शहराला पाणी केव्हा मिळणार याची उत्सुकता मात्र नागरिकांना लागली आहे.

चाकण शहराच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेवरून सध्या दररोज साठ लाख लिटर पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो. परंतु हा पाणीपुरवठा खूप अपुरा आहे. अगदी दोन-चार लाखांवर लोकवस्ती वाढलेली आहे. भामा- आसखेड धरणाचे पाणी पुणे, पिंपरी- चिंचवडला गेले. मात्र, चाकण अजूनही व्याकुळच आहे. चाकण नगरपरिषदेच्या हद्दीत घरगुती -बारा हजार बहात्तर नळजोड आहेत.

  • १३,३५१ - एकूण नळजोड

  • ११५० रुपये - वार्षिक घरगुती पाणीपट्टी

  • ४२०० रुपये - व्यावसायिक पाणीपट्टी

  • २८०० रुपये - बिगर घरगुती पाणीपट्टी

  • २०० - टँकरने शहरासह वाड्या, वस्त्यांवर पाणीपुरवठा

  • ४०० - औद्योगिक वसाहतीत पुरवठा

  • दीड, दोन लाख रुपये - काही सोसायट्यांना महिन्याचा खर्च

चाकण नगर परिषदेच्या हद्दीत भामा नदीवरील वाकी खुर्द येथील पाणीपुरवठा योजनेवरून दररोज साठ लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा दिवसाआड नागरिकांना केला जातो. पाणीपुरवठा सध्या अपुऱ्या पद्धतीने होत आहे.

- सुमीत काळोखे, अभियंता, चाकण नगरपरिषद, पाणी पुरवठा विभाग

गृहप्रकल्पात सुमारे पाचशे सदनिका आहेत. नगर परिषदेच्या वतीने अपुरा पाणीपुरवठा केला जातो तोही दिवसाआड केला जातो. दरवर्षी सहा महिन्यापासून घरगुती वापरासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर विकत घ्यावे लागतात. दररोज सहा ते सात टँकर विकत घ्यावे लागतात. दहा ते बारा हजार लिटरचा एक टँकर असतो. परिसरात बोअरवेल खोदले आहेत, त्यालाही पाणी नाही तेही बंद आहेत. सुमारे १५ ते २० लाख रुपये दर वर्षी पाणी विकत घेण्यासाठी खर्च करावा लागतो.

- कृष्णा सोनवणे, अध्यक्ष, विशाल गार्डन गृहनिर्माण सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com