
कोणतीही आग अचानक लागत नाही. त्यामागे खूप लोकांचा निष्काळजीपणा आणि गैरव्यवहार असतो.
पुणे- कोणतीही आग अचानक लागत नाही. त्यामागे खूप लोकांचा निष्काळजीपणा आणि गैरव्यवहार असतो. भंडारा येथील रुग्णालयाच्या दुर्घटनेमागेही हेच कारण आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
भंडारा रुग्णालयाच्या दुर्घटनेपूर्वी दोन वर्षे फायर सेफ्टीबद्दलची सद्यःस्थिती माहिती अधिकार कार्यकर्ते विकास मदनकर यांनी मागितली होती. त्यातून फायर सेफ्टी उपलब्ध नाही, स्प्रिंकलर नाही, स्मोक अलार्म लावलेला नाही अशी नकारात्मक उत्तरे मिळाली. त्यांनी हीच माहिती पुन्हा 23 जून 2020 मध्ये मागितली. त्यावेळी त्यात आगप्रतिबंधाच्या उपाययोजनेसाठी एक कोटी 52 लाख 44 हजार 783 रुपयांचे अंदाजपत्र जिल्हा शल्यचिकित्सक याच्या सहीने केल्याची माहिती मिळाली. पण, या दुर्घटनेपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही, हे यातून स्पष्ट होते.
सरकारी रुग्णालय फक्त डॉक्टर चालवत नाही तर, त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, महावितरण अशा अनेक विभागांची सामूहिक जबाबदारी असते, असे इंडियन मेडिकल असोसिएशन भंडारा शाखेचे अध्यक्ष डॉ. नितीन तुरसकर यांनी अधोरेखित केले.