रेशमाच्या धाग्यांतून संतसाहित्याची वीण (व्हिडिओ)

पूजा ढेरिंगे
शुक्रवार, 12 जुलै 2019

सुनीता यांनी विणलेले साहित्य

  • संत ज्ञानेश्‍वरांचे पसायदान
  • हरिपाठ
  • संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम यांच्या आरत्या
  • काही मनाचे श्‍लोक
  • विष्णू सहस्रनाम
  • दत्तस्तोत्र

पुणे - शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. अभंग, ओव्या आणि कीर्तनांतून समाजप्रबोधनाचे कार्य केलेल्या संतांचा वारसा रेशमी धाग्यांतून जतन करण्याचा आगळावेगळा छंद पुण्यातील सुनीता आचार्य जोपासत आहेत. त्यासाठी त्या संतांच्या ओव्या कापडावर रेशमी धाग्यांनी शब्दबद्ध करीत आहेत. त्यांच्या या छंदात संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम तसेच गजानन महाराजांची मांदियाळी अवतरत आहे.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून जडलेल्या वीणकामाचा छंद प्रत्यक्षात उतरण्यासाठी त्यांना वयाच्या ४७व्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. घरच्या बिकट परिस्थितीमुळे त्यांचा हा छंद मागे पडला होता. परंतु, ‘आताही मिळे, ते नसे थोडे’ म्हणत त्यांनी हा छंद आता मनापासून जगायला सुरवात केली आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘मला लहानपणापासूनच धार्मिक ग्रंथांची आवड होती. ती आवड तसेच हे साहित्य जपण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठीही काहीतरी करावे, असे मला वाटत होते. कोणतेही जुने साहित्य हवामान, पाणी किंवा अन्य कारणांमुळे काही काळानंतर पुसट होण्याची किंवा त्याची दुरवस्था होण्याची शक्‍यता असते. मात्र, ज्याप्रमाणे तुकारामांची गाथा पाण्यात तरली; त्याप्रमाणे अन्य संतसाहित्यही चिरकाल टिकून राहावे, या उद्देशाने मी ओव्या, अभंग आणि श्‍लोकांची वीण कापडावर बांधण्याचा निर्धार केला. त्यानुसार २००९ पासून मी संतसाहित्य विणण्यास सुरवात केली.’’ 

गेल्या दहा वर्षांत खंड पडू न देता सुनीता या सव्वादोन मीटर कापडावर चारही बाजूंनी समांतर जागा सोडून आतील भागात ओव्या, अभंग रेशमी धाग्याने शब्दबद्ध करीत आहेत.

त्याआधी त्यांचे परिचित महादेव फरकाळे हे कापडावर सुंदर हस्ताक्षरात त्याचे लेखन करून देतात. तर, रेशीम सोडविण्यासाठी सुनीता यांची आई मालती यांची मदत होते. कापडावरील लेखनातील शुद्धलेखनापासून व्याकरणापर्यंत सर्व शब्द योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच सुनीता वीणकामाला सुरवात करतात. 

सुनीता या सध्या भगवद्‌गीता आणि दासोपंतांच्या पासोडीवर काम करीत आहेत. सुनीता या एवढ्यावरच थांबणार नसून, यापुढे पसायदानाचे वीणकाम विविध भाषांमध्ये करणार आहेत. तसेच, वि. दा. सावरकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या सुविचारांची मांडणी करण्याचा त्यांचा मानस आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संगणकाच्या युगात हाताने लिहिण्याची सवय कमी होत चालली आहे. अभंग, कीर्तनाची गोडी असणाऱ्या महाराष्ट्रात संत, माहात्म्यांचे स्थान अढळ आहे. माझ्या या छंदातून सध्याच्या तरुणाईला संतांच्या ओव्यांबद्दल गोडी वाटावी, याकरिता हे कार्य शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे.
- सुनीता आचार्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharatkam Sunita Acharya