

PNE26W44675 सोलापूर ः मिरवणूकीत सहभागी झालेला भक्तांचा सागर भक्तीत तल्लीन होऊन जय भाऊरायाचा जयघोष करताना
PNE26W44673 - सद्गुरू नागनाथ अल्ली महाराजांचा फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान पुतळा व गुरूपत्नींची प्रतिमा
PNE26W44674 - पालखीत विराजमान महाराजांची उत्सवमूर्ती (छायाचित्रे - प्रभुलिंग वारशेट्टी)
आठ किलोमीटर रस्त्यावर पाच तास ‘जय भाऊराया’चा गजर
सोनेरी साजातील दोन हजार महिलांची उपस्थिती; फुलांनी सजलेला रथ अन् भक्तीगीतांनी मिरवणुकीला रंगत
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : पुढे भगवे ध्वज, त्यामागे पालखीत विराजमान भाऊरायांची उत्सवमूर्ती आणि तिच्या दर्शनासाठी एकवटलेला भक्तांचा लोंढा... कुठे कन्नड-मराठी भक्तीगीतांचे सूर, तर कुठे ‘जय भाऊराया’चा अखंड गजर... अशा भक्तिमय वातावरणात समर्थ सद्गुरू अल्ली महाराजांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या पालखी सोहळ्याने मंगळवारी आठ किलोमीटरचा मार्ग पाच तास भक्तीच्या रंगात न्हाऊन काढला. मिरवणूक पुढे सरकत असताना ‘जय भाऊराया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमत होता. सोनेरी वेशातील महिला, फुलांनी सजवलेला रथ आणि संतांच्या प्रतिमांचे सोनेरी रथ यामुळे मिरवणुकीला आगळे वैभव लाभले.
पालखीमागे भक्तीचा लवाजमा
शास्त्रीनगर येथील श्रीराम मंदिरातून सकाळी मिरवणुकीला प्रारंभ झाला. हाती भगवा ध्वज घेतलेले भक्त अग्रभागी होते. त्यामागे पालखीत भाऊरायांची उत्सवमूर्ती विराजमान होती. त्यापाठोपाठ भजनानंदात तल्लीन झालेले सोनेरी रंगातील जवळपास दोन हजार महिला आणि पारंपरिक श्वेत वस्त्रांतील सुमारे एक हजार पुरुष अशा तीन हजार भक्तांच्या सहभागामुळे मिरवणुकीला भव्य स्वरूप प्राप्त झाले. कन्नड-मराठी भक्तीगीतांची सेवा अर्पण करत भक्तांचा हा लवाजमा विडी घरकुलकडे मार्गस्थ होत होता. संस्थानच्या जवळपास १५ जणांनी तब्बल १५० किलो रांगोळी वापरून मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी साकारली. भक्तांच्या सेवाभावातून सजलेला हा मार्ग मिरवणुकीच्या सौंदर्यात भर घालत होता. नागनाथ अल्ली महाराज सत्संग भवन, विडी घरकुल येथे मिरवणुकीची सांगता झाली. महाआरतीनंतर चार हजार भक्तांना चारूबुव्वाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.
३०० किलो फुलांनी सजलेला रथ आकर्षण
भक्तांच्या पाठीमागे जवळपास ३०० किलो फुलांनी सजवलेला रथ होता. त्यामध्ये सद्गुरू अल्ली महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. त्यापाठोपाठ तीन सोनेरी रथांमध्ये श्री काडसिद्धेश्वर महाराज, गुरूलिंग जंगम महाराज, उमदी भाऊसाहेब महाराज, गिरिमल्लेश्वर महाराज आणि औजेकर लक्ष्मणप्पा महाराज यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.
कोट
सद्गुरू अल्ली महाराज संस्थानतर्फे जवळपास १५ जणांनी तब्बल १५० किलो रांगोळी वापरून मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढून सेवा दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव भक्तांच्या सहकार्याने भक्तिभावे पार पडला.
- अंबादास पासकंटी, विश्वस्त, सद्गुरू अल्ली महाराज संस्थान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.