Pune : ‘भीमा पाटस’ भाड्याने देणे आहे ; राज्य सहकारी बँकेकडून निविदा जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भीमा पाटस’ भाड्याने देणे आहे ; राज्य सहकारी बँकेकडून निविदा जाहीर

‘भीमा पाटस’ भाड्याने देणे आहे ; राज्य सहकारी बँकेकडून निविदा जाहीर

केडगाव : भीमा पाटस सहकारी साखर कारखाना चालविण्यास देण्याची निविदा राज्य सहकारी बँकेने जाहीर केली आहे. कारखाना संचालक मंडळ चालविणार की भाडेतत्त्वाने देणार, याबाबत संदिग्धता होती. निविदा निघाल्याने कारखाना भाड्याने चालविण्यास देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. निविदा प्रसिद्ध झाल्याने तालुक्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव शितोळे यांनी सन १९७९ मध्ये भीमा पाटस कारखाना सुरू केला. सन १९९२ मध्ये संचालक मंडळाच्या निवडणुकीत कारखान्यावर तत्कालीन आमदार सुभाष कुल व पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी वर्चस्व मिळविले. कुल अध्यक्ष असले, तरी कारखान्याच्या निर्णय प्रक्रियेत थोरात यांचा वरचष्मा होता. सन २००१ मध्ये कुल यांच्या निधनानंतर सन २००२ मध्ये राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात, अशी कारखान्याची निवडणूक झाली. त्यात थोरात यांना पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून कारखान्यावर आमदार कुल यांची सत्ता आहे. आता कारखाना कोण चालविण्यास घेईल, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

निविदेनुसार कारखाना चालवायला घेणाऱ्याला एकरकमी परतफेड योजनेतून पुणे जिल्हा बँकेचे १६२ कोटी रुपये, तर राज्य सहकारी बँकेचे ३३ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. कारखाना २५ वर्ष भाड्याने देण्यासाठी मोहोरबंद निविदा मागविण्यात आली आहे. २३ व २४ नोव्हेंबरला कारखान्याची मालमत्ता पाहता येणार आहे. तीन डिसेंबरला निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॅा. अजित देशमुख यांनी ही निविदा प्रसिद्ध केली आहे.

कामगारांकडून निर्णयाचे स्वागत

भीमा कामगार संघाचे अध्यक्ष अर्जुन दिवेकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, ‘‘कारखाना सुरू होणे महत्त्वाचे आहे. कारखाना कोणीही चालवायला घेतला, तरी जुने कामगार पुन्हा कामावर घेतले जाणार आहेत. कामगारांची देणी टप्प्याटप्याने मिळणार आहे.’’

loading image
go to top