विजयाची हॅट्‌ट्रिक रडतखडत

योगीराज प्रभुणे  
Friday, 25 October 2019

खडकवासला विधानसभा मतदारसंघात नऊ वर्षांपूर्वी ‘कमळ’ उमलले आणि फुललेही; पण या निवडणुकीत भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी हुकणारी ‘हॅटट्रिक’ सुमारे दोन हजार सहाशे मतांनी अक्षरश: रडतखडत राखली; पण यात घसरलेला मतदानाचा टक्का हा भाजपला आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारा आहे.

पुणे/खडकवासला -  खडकवासला विधानसभा मतदारसंघात नऊ वर्षांपूर्वी ‘कमळ’ उमलले आणि फुललेही; पण या निवडणुकीत भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी हुकणारी ‘हॅटट्रिक’ सुमारे दोन हजार सहाशे मतांनी अक्षरश: रडतखडत राखली; पण यात घसरलेला मतदानाचा टक्का हा भाजपला आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारा आहे. या निवडणुकीत तापकीर यांच्या पारड्यात एक लाख २० हजार ५१८ मते टाकली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांना एक लाख १७ हजार ९२३ मते दिली. 

या मतदारसंघातील भाजपची पडझड लक्षात घेता दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे याच विधानसभा मतदारसंघात पहिल्या विजयानंतर केलेले विधान आठवते. तेव्हा ते म्हणाले होते, ‘हा निकाल सत्तापरिवर्तनाची नांदी आहे.’ तेच विधान आता भाजपसाठीच सत्ता परिवर्तनाचे संकेत देणारे मानले जात आहे. 

मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये ‘मनसे’ला या मतदारसंघाने ‘साथ दिली’. त्यानंतर २०११च्या पोटनिवडणुकीपासून खडकवासल्यात सातत्याने दोन वेळा कमळ फुलले. मागील निवडणुकीत तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप बराटे यांचा ६३ हजार मतांनी पराभव केला होता. लोकसभेसाठी या मतदारसंघाने ६५ हजारांचे मताधिक्‍य भाजपला दिले होते. मात्र, अवघ्या सहा महिन्यांनंतरच्या विधानसभेत भाजपचे मताधिक्‍य इतके प्रचंड कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसते. 

राज्यातील जनतेला भाजप नेत्यांनी गृहीत धरले होते. हेच चित्र या मतदारसंघातदेखील जाणवले. मतदारसंघातील विकासकामे हाच आपल्या प्रचाराचे ‘ब्रॅंडिंग’ असे चित्र निर्माण करण्यात तापकीर यांना फारसे यश आले नसल्याचे या निकालातून दिसून येते. पक्षांतर्गत स्पर्धा, शिवसेनेचा नाराज गट, शेजारच्या मतदारसंघात प्रचारासाठी गेलेले सेनेचे कार्यकर्ते या सर्वांचा थेट परिणाम भाजपचे मताधिक्‍य कमी होण्यावर झाला. तरुण नवा उमेदवाराचा चेहरा राष्ट्रवादीने दोडके यांच्या रूपाने दिला. सलग दोन वेळा निवडून दिल्यानंतर आता बदल करण्याच्या दृष्टीने मतदारांनी दोडके यांना मतदान केले. 

दोडके यांचे ‘होम पिच’ असलेल्या वारजे ते बहुली परिसरातून मतमोजणीची सुरवात झाली. परिणामी, पहिल्या फेरीपासूनच दोडके यांची आघाडी होती. ही आघाडी बाराव्या फेरीपर्यंत कायम ठेवली. तेराव्या फेरीमध्ये बावधन, भुसारी कॉलनी येथील मतमोजणी सुरू झाली. त्या वेळी तापकीर यांनी प्रथमच शंभर मतांची आघाडी घेतली. कात्रज, धनकवडी आणि बिबवेवाडीच्या काही भागातील मतमोजणी झाली. या भागात भाजपचे प्राबल्य असल्याने तापकीर यांना थेट चार हजार मतांची आघाडी येथून मिळाली. वडगाव, धायरी, नऱ्हे, खेड शिवापूर या भागातून तीन हजार मतांची  आघाडी घेत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.

‘कमळ’ला साथ ‘वंचित’ची!
या मतदारसंघातील निवडणूक ही पहिल्यापासून दुरंगी असल्याचे दिसत होते. मात्र, वंचित बहुजन आघाडीचा ‘फॅक्‍टर’ भाजपच्या विजयात महत्त्वाचा ठरल्याचे स्पष्ट होते. ‘वंचित’च्या अप्पा आखाडे यांना पाच हजार ९३१ मते मिळाली. दोडके यांना विजयासाठी फक्त दोन हजार ५९५ कमी पडली. यामुळे ‘कमळ’ला वंचितची साथ मिळाल्याचे दिसते. तसेच, तीन हजार ५६१ जणांना कोणताही उमेदवार योग्य नसल्याने ‘नोटा’ बटन दाबले.

मतदारसंघात गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडून मी प्रचार केला. त्याला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मी मतदारांचा आभारी आहे. भविष्यात शहरी, ग्रामीण विकास हा कामाचा केंद्रबिंदू असेल.
- भीमराव तापकीर, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhimrao Tapkir won in Khadakwasla Assembly Constituency