भोर तालुक्यास साथीच्या आजारांचा विळखा
भोर, ता. २१ : बदलत्या हवामानामुळे शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना जुलाब-उलट्या, थंडी, ताप आणि अशक्तपणा आदी साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. यामुळे भोर उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी हॉस्पिटल व दवाखान्यांत रुग्णांची गर्दी होत आहे.
भोर शहरातील प्रत्येक डॉक्टरांकडे आणि शासकीय दवाखान्यांमध्ये जुलाब-उलट्यांच्या रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे आणि जुलाब-उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानंतर त्वरित दवाखान्यांत जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
वाढत्या तापमानामुळे दुपारी उन्हाचा चटका बसत असला तरीही या आठवड्यात दोन-तीन दिवस पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला. नागरिक वाढत्या उन्हामुळे अनेक दिवस साठविलेले थंड पाणी पितात. याशिवाय पाण्याचा होत असलेला अशुद्ध पुरवठा, अनेक दिवसांचे आईसक्रीम, चॉकलेट आणि प्लॅस्टिकच्या पिशवीतील अनेक दिवसांपूर्वी पॅकिंग केलेली खाद्ये खाल्ल्यामुळे नागरिकांना साथीचे आजार सुरू झाले आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी उकळून गार केलेले किंवा शुद्धीकरण केलेले स्वच्छ पाणी प्यावे, उघड्यावरील व शिळे अन्न खाऊ नये, आइसक्रीम व अशुद्ध पाण्यापासून बनविलेले शीतपेय पिण्याचे टाळावे आणि सार्वजनिक ठिकाणी अन्न शिजविण्यासाठी शुद्ध पाणी वापरावे. कुठलाही त्रास जाणविल्यास लगेचच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा भोर शहरातील ‘आपला दवाखाना’ येथील डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- डॉ. अभय तिडके, तालुका वैद्यकीय अधिकारी, भोर पंचायत समिती

