Bhor News : लोकसभा निवडणूकीत अनंतराव थोपटे यांची जादू चालणार ?

राज्याचे माजी मंत्री आणि कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची वयाच्या ९३ व्या वर्षीही राजकीय करिश्मा कायम आहे.
bhor lok sabha election anantrao thopte politics
bhor lok sabha election anantrao thopte politics Sakal

भोर : राज्याचे माजी मंत्री आणि कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची वयाच्या ९३ व्या वर्षीही राजकीय करिश्मा कायम आहे. एकेकाळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार राहिलेल आणि जिल्ह्यातील कॉग्रेसचे एकमेव आणि एकनिष्ठ नेते म्हणून अनंतराव थोपटे यांचे नाव आदराने घेतले जात आहे.

अनंतराव थोपटे हे सद्य परिस्थितीत कॉग्रेसची विचारधारा असलेले जिल्ह्यातील एकमेक ज्येष्ठ नेते आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांची जादू करिश्मा करेल असा विश्वास असल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांबरोबर महायुतीच्या घटकपक्षांचे संभाव्य उमेदवारही त्यांची भेट घेत आहेत.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षाशी एकनिष्ठ राहून पुरोगामी विचारांशी कधीही तडजोड न करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे बघीतले जाते. त्यामुळे त्यांचा आशिर्वाद आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी त्यांच्या घरी नेत्यांची रीघ लागली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, देशाच्या राजकारणातील महत्वाचे मानले जाणारे आणि अनंतराव थोपटे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, महायुतीत सहभागी झालेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी मंत्री सुनिल तटकरे, शिवसेनेचे विजय शिवतारे,

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार आणि नव्या दमाचे आमदार रोहित पवार आदींनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे. अजूनही अनेक नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

भोर विधानसभा मतदारसंघात १९७२, १९८०, १९८५, १९९०, १९९५ आणि २००४ या सहावेळा ते आमदार म्हणून विजयी झाले आहेत. १९९९ सालातील निवडणूकीत ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. परंतु राष्ट्रवादी कॉग्रेसचे काशिनाथराव खुटवड यांनी त्यांचा पराभव केला.

त्यावेळी थोपटे यांचा पराभव करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा होता. २००९ साली अनंतराव थोपटे यांनी मुलगा संग्राम थोपटे यांना राजकारणात आणले आणि आमदारही केले. तेंव्हापासून संग्राम थोपटे हे २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

केवळ भोर विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर जिल्हा आणि राज्यात कॉग्रेस म्हणजे थोपटे हे समीकरण निर्माण झाले होते. कॉग्रेसमधील ज्येष्ठ नेते असतानाही फक्त विरोधातील पक्षातच नव्हे तर खुद्द कॉग्रेसमध्येच अनंतराव थोपटे यांच्या शब्दाची किंमत काहीशी कमी झाली.

आणि आमदार संग्राम थोपटे यांना राज्याच्या मंत्रीमंडळात ना मंत्री होता आले, ना विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान होता आले आणि ना विरोधीपक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या तालुक्यातील थोपटे विचारांच्या कार्यकर्त्यांनी

पुण्यातील कॉग्रेस भवनाची तोडफोड केली आणि भोरमध्ये कॉग्रेसचे झेंडे जाळले. परंतु अनंतराव थोपटे यांनी स्वतः या गोष्टीची निषेध केला. आपली राजकीय प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न झाला तरीही अनंतराव थोपटे यांनी पुरोगामी विचार त्यांनी कधीही सोडले नाहीत.

त्यांची एकनिष्ठा आणि पुरोगामी विचारसरणी यामुळेच राज्याच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जात आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक पक्षांचे नेते त्यांच्याकडे येऊन आपल्या फायद्यासाठी त्यांना जुन्या आठवणींची जाणीव करून देत आहेत.

परंतु अनंतराव थोपटे यांची एकनिष्ठतेची विचारसरणी सर्वश्रुत असल्यामुळे ते स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीही तडजोड करणार नसल्याचे बोलले जात आहे. अनंतराव थोपटे हे ज्यांच्या डोक्यावर हात ठेवतील तोच बारामतीचा खासदार आणि भोरचा आमदार होईल. अशा प्रकारच्या भावना भोरमधील नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com