
भोरमधील शिवप्रेमी पानिपतमध्ये उभारणार छत्रपतींचा पुतळा
भोर : हरियाना राज्यातील पानिपत येथे स्थायिक असलेल्या रोड मराठा समाजाचे महाराष्ट्रातील मराठा समाजाविषयीचे प्रेम पाहून भोरमधील शिवप्रेमींनी पानिपत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ११ फुटांचा पुतळा बसविण्याच्या निर्णय घेतला आहे. पानिपत येथील बस्तारा गावातील बागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधीवत प्रतिस्थापना करण्यात येणार आहे.
हरियानातील कर्नाल जिल्ह्यातील पानिपत परिसरातील बस्तारा गावात तेथील माजी आमदार विरेंद्रसींग यांच्या हस्ते रविवारी (ता.२६) दुपारी २ वाजता पुतळ्याची प्रतिस्थापना करण्यात येणार आहे. यासाठी भोरमधील शिवसैनिकांनी ''पानिपत गौरवशाली मोहीम'' सुरु केली असून भोर शहर आणि तालुक्यातील अनेक शिवसैनिक स्वखुशीने सहभागी होत आहेत. रविवारच्या पानिपत येथील कार्यक्रमास भोरमधील ५० शिवसैनिक जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हातात राजदंड घेऊन सिंहासनावर बसलेला पुतळा हा भोरमधील शिल्पकार दीपक थोपटे यांनी साकारला आहे.
सोमवारी (ता.२०) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भोरमधील शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर भोरमधील व्यावसायिक यशवंत डाळ यांनी हा पुतळा भोरमधून पानिपत येथे पाठविला आहे. पुतळा प्रतिस्थापित करण्यासाठी भोरमधील शिवसैनिक पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर, रोहिडेश्वर, राजगड, तोरणा व पुरंदर या पाच किल्यांवरील माती आणि पंचगंगेचे पाणी घेऊन जाणार आहेत.
पानिपतच्या रोड मराठा समाजाविषयीची नाळ घट्ट
पानिपत येथील रोड मराठा समाजविषयीची नाळ घट्ट करण्यासाठी त्यांचे महाराज आणि समस्त मराठा समाजाप्रती असलेले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा पाहून भोरमधील शिवप्रेमींनी हा अनोखा उपक्रम करण्याचे ठरविले आहे. भोरमधील शेकडो शिवसैनिकांनी, राजकारणी व्यक्तींनी, व्यावसायिकांनी आणि अनेकांनी स्वतःहून या मोहिमेसाठी हातभार लावला आहे.
Web Title: Bhor Pune Panipat Shiovaji Maharaj Statue
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..