

वेल्हे, ता. २२ : ‘‘भोर व राजगड तालुक्यांतील सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प हा केंद्रशासन व राज्य शासनाचा नसून एका खासगी कंपनीचा आहे. या कंपनीच्या मागे मोठ्या शक्ती उभ्या आहेत. प्रकल्प सहजासहजी हटणार नसल्याची जाणीव आहे. मात्र, यासाठी तीव्र आंदोलन करणार आहे,’’ असे प्रतिपादन माजी आमदार व भोर-राजगड सबस्टेशन व टॉवर लाईन हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी केले.
वांगणी (ता. राजगड) येथे शुक्रवारी (ता. २१) थोपटे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. राजगड तालुक्यातून जाणाऱ्या विद्युत टॉवर लाईनविरोधात संघर्ष समितीच्या माध्यमातून राजगड तालुक्यात सात ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड म्हणाले की, विद्युत क्षेत्रात नफा मिळत असल्याने अदानी कंपनीने या क्षेत्रात प्रवेश केला आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे घराघरांत बसविण्यात येणारे विद्युत मीटर होय. ही खासगीकरणाची सुरुवात म्हणावी लागेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जमिनी वाचवण्यासाठी या संघर्षात सामील होणे आवश्यक आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके, जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव धरपाळे, माजी सभापती दिनकर सरपाले, राजगड सहकारी कारखान्याचे संचालक प्रताप शिळीमकर, राजगड पंचायत समिती सदस्य गणेश जागडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा युवती अध्यक्षा दुर्गा चोरघे, अमोल पडवळ, शिवाजी चोरघे, शिवराज शेंडकर, राजू रेणुसे, आकाश वाडघरे, नाना राऊत यांच्यासह नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, रविवारी (ता. २३) कापूरव्होळ (ता. भोर) येथील आंदोलनात राजगड तालुक्यातून सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक शेतकरी, नागरिक आंदोलनासाठी उपस्थित राहणार असल्याचा विश्वास माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.
03816
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.