

हिर्डोशी, ता. ३१ : भोर तालुक्यातील हिरडस मावळासह आंबवडे खोऱ्यास शनिवारी (ता. ३१) पहाटे तीन तास पडलेल्या पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे भात पिकाचे होत्याच नव्हते झाले. पावसाचे प्रमाण एवढे होते की, खाचरे पाण्याने तुडुंब भरली. कापलेले भात पीक पाण्यावर तरंगत होते. भात पूर्ण भिजल्याने वाया गेले. यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला असल्याने भात उत्पादक हतबल झाला आहे.
भोर तालुक्यात दुष्काळामुळे भातशेती करपून गेल्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी कृषिपंप, टँकर आदींच्या साहाय्याने पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी धडपड केली होती. दुष्काळातून व पाणी देऊन वाचलेल्या पिकाची शेतकऱ्यांनी कापणी केली होती. परंतु शनिवारी (ता.३१) पहाटे पडलेल्या पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे शासनाने नुकसानीची त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पावसामुळे भिजल्याने तांदूळही काळा पडणार असून पेंढ्यांचेही नुकसान होणार आहे. तसेच उभ्या पिकांचे दाणे मुसळधार पावसात झडून गेले आहेत. भातासह झेंडू पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याने शासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित मदत करावी, अशी मागणी शेतकरी बाबाजी साळेकर (साळव), अंकुश मादगुडे (भावेखल), नितीन जेधे (आंबवडे), नितीन कुडले (करंजे) यांनी केली आहे.
भिजलेले भात बाहेर काढण्यासाठी धडपड
पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या खाचरातील भिजलेल्या पिकाची अवस्था पाहून शेतकरी सुन्न झाला. कुटुंबाच्या साहाय्याने भिजलेले भात गोळा करत बांधावर काढताना त्यांची दमछाक झाली. पुन्हा बांधावर काढलेले पीक वाळत टाकून काहीतरी पदरात पडेल या आशेने शेतकरी धडपड करीत होता.
भात पोसणीच्या काळात पावसाने दडी मारल्याने लिफ्टच्या साहाय्याने भाताला पाणी देऊन भात जगवले होते. स्वच्छ आभाळ असल्याने शुक्रवारी भात कापून खाचरातच वाळत ठेवले होते. परंतु पहाटे पडलेल्या पावसाने कापलेले भात भिजले. २० पोती भात मिळाले असते परंतु आता २५ टक्केही भात मिळणार नाही.
- विठ्ठल व गणपत बढे, शेतकरी भावेखल (ता. भोर)
04122, 04121
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.