

NSK26H34185, NSK26H34186
भोकर (ता. जळगाव) : दरोड्याच्या घटनेनंतर स्टेट बँकेबाहेर जमलेली गर्दी. दुसऱ्या छायाचित्रात पिस्तूलचा धाक दाखवून दुचाकीवरून रोकडच्या बॅगा घेऊन पळणारा दरोडेखोर.
---
भोकर येथे स्टेट बँकेच्या
शाखेवर सशस्त्र दरोडा
रोकडसह दगिने लंपास; ग्रामस्थांनी रस्ता अडवून पकडले
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : भोकर (ता. जळगाव) येथील स्टेट बँकेच्या शाखेत शनिवारी (ता. ३१) दिवसा दुपारी अडीचच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. चार-पाच सशस्त्र दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करून कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखून रोकडसह सोने लुटून नेले. इतकेच नाही तर शाखा व्यवस्थापक आणि रोखपालास बेदम मारहाण करून खुर्चीला बांधून दरोडेखोर पसार झाले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा भोकर गावात दाखल झाला.
स्टेट बँकेच्या भोकर शाखेत दुपारी चार-पाच शसस्त्र दरोडेखोर दाखल झाले व त्यांनी बँक कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखले. दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापक जयेश राणे आणि रोखपाल रणजित मराठे यांना मारहाण केली व दोघांनाही खुर्चीला बांधून ठेवले. त्यानंतर रोकड आणि सोने बॅगांत भरले. बँकेतील इतर कर्मचाऱ्यांवर एक-दोन दरोडेखोरांनी पिस्तूल रोखून धरल्याने त्यांना हालचाल करता येत नव्हती. रोकड व सोने बॅगेत भरून दरोडेखोरांनी दुचाकींवरून पळ काढला. दरोडेखोर बँकेतून बाहेर पडताच श्री. मराठे यांनी बँकेचा अलार्म वाजवला व ग्रामस्थ व पोलिसांना माहिती दिली. भोकर गावातून निघणाऱ्या रस्त्यांवरील प्रत्येक गावाकडून मदत मागितल्याने किनोद, लिधूर, डिकसाई या गावातील तरुणांनी दुचाकींवरून दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, उपअधीक्षक नितीन गणापुरे, राहुल गायकवाड फौजफाट्यासह भोकरच्या दिशेने रवाना झाले. ग्रामस्थांनी तिघांना पकडले. दोन जण फरार आहेत. दरोडेखोरांनी नेमकी किती रोख रक्कम आणि किती सोने लुटले, याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही