उमेदवारीवरून भोसे गटात बाहेरचा अन आतला अशी चर्चा: भोसे जिल्हा परिषद गटात भाजपाला गटाबाहेरचा उमेदवार देण्याची वेळ:विरोधकांकडून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

उमेदवारीवरून भोसे गटात बाहेरचा अन आतला अशी चर्चा: भोसे जिल्हा परिषद गटात भाजपाला गटाबाहेरचा उमेदवार देण्याची वेळ:विरोधकांकडून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

Published on

लोगो : भोसे जि.प. गट
---
भाजपला गटाबाहेरचा उमेदवार देण्याची वेळ
बाहेरचा अन्‌ गावचा उमेदवारीवरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
महेश पाटील : सकाळ वृत्तसेवा
सलगर बुद्रूक, ता. २३ : अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशीच भोसे झेडपी गटातील काही प्रमुख उमेदवारांपैकी दोन प्रमुख उमेदवारांमध्ये गावचा अन्‌ बाहेरचा या विषयावरून कलगीतुरा रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भोसे जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून दामाजी शुगरचे विद्यमान संचालक बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या समोर भाजपचे प्रमुख उमेदवार म्हणून मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर आहेत. त्यांचे गाव हिवरगाव हे हुलजंती जिल्हा परिषद गटात येत असल्याने बाहेरच्या उमेदवाराला भोसे जिल्हा परिषद गटामधील मतदार स्वीकारणार नाहीत, असे विधान बसवराज पाटील यांनी केले आहे. भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांनी देखील या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, गेल्या नऊ वर्षांपासून आमदार समाधान आवताडे यांचा विश्वासू सहकारी म्हणून काम करत आहे. मी पंचायत समितीचा सभापती असताना जास्तीत जास्त कामे ही भोसे जिल्हा परिषद गटामध्येच केली आहेत. माझी कामाची धडपड बघूनच आमदार आवताडे यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, भोसे जिल्हा परिषद गट हा मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील मातब्बर राजकीय पुढाऱ्यांचा गट म्हणून ओळखला जातो. या गटातून मागील झेडपीच्या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या गटाचे दिलीप चव्हाण निवडून आले होते. पुढे त्यांना सोलापूर झेडपीचे उपाध्यक्षपदही मिळाले होते. त्यानंतर याही निवडणुकीत आरक्षणाच्या सोडतीमध्ये भोसे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले. त्यामुळे या गटात पुन्हा एकदा ओपन प्रवर्गातील उमेदवाराला भाजपकडून उमेदवारी मिळेल, असे चित्र असताना, येथे वेगळेच समीकरण पाहायला मिळत आहे.
भोसे गटात भाजपकडे मातब्बर राजकीय मंडळी असताना, बाहेरच्या गटातील उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारी कशी पडली? याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे याचे आयते कोलीत विरोधी प्रमुख उमेदवारांपैकी एक बसवराज पाटील यांना मिळाले आहे.
भोसे गटात भाजपकडून जातीय समीकरण पाहून उमेदवारी दिल्याची चर्चा राजकारणातील जाणकार मंडळींकडून होत आहे. भोसे गटात धनगर समाजाचे प्राबल्य जास्त आहे, म्हणूनच माजी सभापती प्रदीप खांडेकर हे धनगर समाजाचे घटक असल्याने त्यांना भोसे गटातून उमेदवारी मिळाल्याची चर्चा राजकीय पंडितांमध्ये आहे. त्यामुळे भोसे जिल्हा परिषद गटामध्ये विकासाचे मुद्दे बाजूला राहून आतला आणि बाहेरचा उमेदवार, यावरच आरोप- प्रत्यारोप होऊन ही निवडणूक पार पडली जाणार की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
---
भोसे जि. प. गटातील उमेदवार
भोसे गटातून प्रदीप खांडेकर (भाजप), बसवराज पाटील (ती.वि. आघाडी), दाजी दोलतडे( राष्ट्रवादी), रविकिरण कोळेकर (काँग्रेस), बापू मेटकरी, सिद्धेश्वर आवताडे, संजय कोळेकर, रामचंद्र जाधव, संतोष बिराजदार, रामदास मिसकर, महेश टिके, धर्माण्णा हताळी, ज्ञानेश्वर कराडे, श्रीशैल हताळी, सिद्धेश्वर रणे, शंकर भगरे, दाजी दोलतडे आदी उमेदवारांनी झेडपीसाठी अर्ज भरला आहे.
---
भोसे गटातील गावे
- रड्डे गण : रड्डे, निंबोणी, चिक्कलगी, मारोळी, शिरनांदगी, सलगर बुद्रूक, लवंगी.
- भोसे गण : भोसे, नंदेश्‍वर, हुन्नूर, रेवेवाडी, लोणार, पडोळकरवाडी, महमदाबाद हु., मानेवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com