इंधन, वेळेचा अपव्यय अन् जिवाला अपघाताचाही धोका
भोसरी, ता. ७ : पुणे - नाशिक महामार्गावरील कासारवाडी, नाशिक फाटा ते स्पाइन रस्त्यावरील राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या सुमारे साडेसात किलोमीटरच्यापर्यंतच्या टप्प्यातील चौकांमध्ये संध्याकाळच्या वेळेस हमखास वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर भोसरी पोलिस वाहतूक शाखा विभाग आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने संयुक्तपणे मार्ग काढणे गरजेचे आहे. मात्र, दोन्हींकडून त्या प्रकारचे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.
पुणे - नाशिक महामार्गावर गुडवील चौक, लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वार चौक, महामार्गाच्या सेवा रस्त्यावर चांदणी चौक, संविधान चौक, पीएमटी चौक, भोसरी-आळंदी रस्ता चौक, बीआरटीएस चौक, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह चौक, महामार्गावर पीएमपीएमएल सद्गुरू डेपो चौक, इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौकाकडे जाणारा चौक आणि स्पाइन रस्त्यावरील राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी प्रमुख चौक येतात. सेवा रस्त्यावरील चौकांतील अंतर अगदी शंभर-दोनशे मीटर आहे. त्यामुळे एका चौकात झालेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम हा इतर चौकातही झालेला दिसून येतो. स्पाइन रस्त्यावरील राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात चऱ्होली, भोसरी, मोशी, पिंपरी चिंचवड शहर, चाकण, राजगुरुनगर, नाशिक, पुणे आदी भागाकांकडे जाणारी वाहने प्रवास करत असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ या चौकात असते.
कोंडी होण्याची कारणे
- भोसरीतील चांदणी चौकात लांडेवाडीकडून येणारी वाहने मोशी, आळंदी रस्ता व दिघी रस्त्याकडे वळतात.
- लांडेवाडी चौक मार्गे निगडी चिंचवड आदी भागांकडे जाणारी वाहनेही या चौकातून जातात
- चक्रपाणी वसाहतीकडे जाणाऱ्या चौकातील पीएमपी थांब्यामुळेही कोंडी
- संविधान चौकात दिघी रस्त्याने येणारी वाहने मोशी, पुणे, लांडेवाडी आदी मार्गाने पुढे जातात.
- प्रत्येक चौकात वाहन चालक अस्ताव्यस्तपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.
- पीएमपी सद्गुरु डेपो चौक, इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौकांत वाहतूक नियंत्रक दिवे. मात्र वाहन चालकांद्वारे त्याचे उल्लंघन
काय करता येईल ?
- सेवा रस्ते हातगाडी आणि पथारीमुक्त करणे
- सेवा रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील ‘नो पार्किंग झोन’ची काटेकोरपणे अंमलबजावणी
- संध्याकाळच्या वेळेस खासगी प्रवासी बसना रस्त्यावर थांबण्यास मज्जाव करणे
- चौकातील वाहतूक पोलिस आणि वॉर्डनची संख्या वाढविणे
- वाहतूक नियंत्रक दिव्यांचे पालन न करणाऱ्या चालाकांवर कडक कारवाई करणे
भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गासह सेवा रस्त्यावर संध्याकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झालेली असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस भोसरीतील रस्त्यांवरून प्रवास करताना वेळ वाया जातो. त्याचप्रमाणे मानसिक त्रासही होतो.
- संपत शिंदे, वाहन चालक
भोसरीतील रस्त्यावरील हातगाड्या आणि पथारीवाल्यांविरोधात नियमित कारवाई सुरू आहे. या कारवाईत अधिक सातत्यपणा आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.
- तानाजी नरळे, ‘इ’ क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

