वाहतूक कोंडी सोडविण्याचे मोठे आव्हान

वाहतूक कोंडी सोडविण्याचे मोठे आव्हान

Published on

भोसरी, ता. २३ ः भोसरीतील भोसरी गावठाण-शितलबाग-खंडोबामाळ प्रभाग क्रमांक सातमध्ये पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, तुंबणारी पावसाळी आणि सांडपाणी वाहिनी गटारे, रस्त्यावरील विक्रेत्यांची अतिक्रमणे आदींसह इतरही नागरी समस्या सोडविण्यासह नागरी सुविधा पुरविण्याचे आव्हान नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे आहे.
भोसरीतील प्रभाग सात हा भोसरी परिसराचा केंद्रबिंदू आहे. याच प्रभागात भोसरीचे गावपण जपणारे गावजत्रा मैदान, बैलगाडा घाट आहेत. त्याचप्रमाणे भोसरीच्या वैभवात भर घालणारे मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षणकेंद्र, जलतरण बाळासाहेब लांडगे जलतरण तलाव, सहल केंद्र, महापालिकेची छत्रपती श्री शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, शिवसृष्टी आदी प्रकल्प याच प्रभागात उभारले आहेत. असे असतानाही या प्रभागातून जाणारा राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील पुणे-नाशिक महामार्गाचा सेवारस्त्यावर चांदणी चौक, पीएमटी चौक, भोसरी-आळंदी रस्ता आदी भागांत नित्याचीच होणारी वाहतूक कोंडी ही वाहन चालक आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सेवा रस्त्यावर फळे विक्रेत्यांसह इतर विक्रेत्यांचे होणारे अतिक्रमण काढणे ही समस्या सोडविण्याचे आव्हान नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे आहे.
या प्रभागातील रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण झाले आहे. मात्र, काही रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण झालेले नाही. काही रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. प्रभागातील सर्वच रस्त्यांचे दर्जेदार सिमेंट कॉंक्रिटकरण होणे गरजेचे आहे. रस्त्यांवर असणारे पावसाळी आणि सांडपाणी वाहिनी गटारे तुंबतात. गटाराचे चेंबरही वारंवार तुटतात. ही समस्या शांतिनगर आणि लांडेवाडी ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्यावर वारंवार उद्भवते.
प्रभागातील रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम झालेले आहे. मात्र, खंडोबामाळ, भोसरी गावठाणातील मारुती मंदिराजवळील रस्ता, शांतिनगरमधील रस्ता, पीएमटी चौक आदी सिमेंट कॉंक्रिटीकरण न झालेल्या रस्त्यावर पडणारे खड्डे हे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
प्रभागात येणाऱ्या अंकुशराव लांडगे नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. नाट्यगृहातील खुर्च्या तुटलेल्या आहेत. रंगमंचावरील पडद्यांचे लोखंडी आधारस्तंभाच्या लोखंडी दोरखंड बदलणे गरजेचे आहे. ग्रीनरुमधील फर्निचरची दुरवस्था झाली आहे. नाट्यगृहात अद्यापपर्यंत मेटल डिटेक्टर बसविण्यात आलेला नाही. छतावरील पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीनंतरही काही प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे काही ग्रीनरुमसमोर पाणी साचलेले असते.
प्रभाग सातमधील पीएमटी चौक, बापुजीबुवा चौकाजवळील क्रांतिसूर्य महात्मा फुले शाळा, पुणे-नाशिक महामार्गावरील ऐतिहासिक प्रवेशद्वार आदींसह इतरही काही भागात नागरिकांद्वारे उघड्यावर कचरा टाकला जातो. हा कचरा महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांद्वारे दररोज उचलला जातो. त्यामुळे प्रभाग कचरा कुंडीमुक्त करण्याचे आव्हान महापालिका प्रशासन आणि नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे आहे.


हे आहेत प्रमुख प्रश्न
- राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील रस्त्यावरील अर्बन सिटीचे काम रखडले
- उड्डाणपुलाखालील भागाची दुरवस्था
- अर्बन सिटीचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे
- रस्त्यांच्या कडेला टपऱ्या आणि हातगाड्यांची वाढती संख्या ही नागरिकांची डोकेदुखी
- वाढत्या अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांवर आळा बसविणे गरजेचे

भोसरीतील प्रभाग क्रमांक सातमधील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विविध विक्रेत्यांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे. प्रभागात उद्भवणाऱ्या नागरी समस्या महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा समन्वय साधून सोडविल्या जातील.
- तानाजी नरळे, ‘इ’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com