भोसे गटात इच्छुकांची वाढली गर्दी, निवडणूक लक्षवेधक

भोसे गटात इच्छुकांची वाढली गर्दी, निवडणूक लक्षवेधक

Published on

भोसे गटात भालके विरुद्ध आवताडे लढत
इच्छुक उमेदवारांची वाढली गर्दी; निवडणूक लक्षवेधक
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. १८ : तालुक्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या भोसे जिल्हा परिषद गटातील निवडणूक यंदा चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. हा गट पुन्हा ताब्यात घेणे भालके गटासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला असून, आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी गटावरील वर्चस्व कायम राखणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत रामचंद्र जाधव, दिलीप चव्हाण आणि नामदेव जानकर यांच्यात तिरंगी लढत झाली होती. या लढतीत दिलीप चव्हाण यांना निसटता विजय मिळाला होता. गटात धनगर समाजाची मतदारसंख्या अधिक असली तरी आजवर जातीय समीकरणांचा फारसा प्रभाव दिसून आलेला नाही. सुमारे ४४ हजार ८५६ मतदार असलेल्या या गटातून जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी स्थानिक इच्छुकांसह बाहेरील अनेक जण चाचपणी करत आहेत.
भोसे गट हा स्व. भारत भालके यांचा बालेकिल्ला मानला जात होता; मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत या गटातील बहुतांश गावे आमदार समाधान आवताडे यांच्या पाठीशी राहिली. निकालानंतर भालके समर्थक नितीन पाटील व गुलाब थोरबोले यांनीही आमदार आवताडे यांच्या गोटात प्रवेश केला. कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने आमदार आवताडे सक्षम समर्थकांना संधी देत आपला जनाधार टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, भालके गटाकडून भगीरथ भालके पुन्हा जनाधार मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. विधानसभा निवडणूक लढवलेले अनिल सावंत यांनीही या गटातून निवडणूक लढवण्यासाठी सर्व्हे केला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी पक्षीय चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यामुळे काँग्रेसचे राज्य सचिव अॅड. रविकिरण कोळेकर यांनीही चाचपणी सुरू केली आहे.
स्व. भारत भालके यांचे समर्थक ‘दामाजी’चे संचालक बसवराज पाटील हे देखील दावेदार असून, सर्वांच्या एकमतानेच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपकडे सध्या या गटात प्रबळ उमेदवार नसल्याने माजी सभापती प्रदीप खांडेकर यांना निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही या गटातून उमेदवार देण्याचा दावा जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी व्यक्त केला आहे.
रड्डे पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी राखीव असून, भोसे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. पंचायत समितीसाठी अद्याप ठोस इच्छुक पुढे आलेले नाहीत. जिल्हा परिषद इच्छुकांकडून ‘खर्च उचलल्यास पंचायत समिती लढवू’ अशी अट घातली जात आहे.
अनिल सावंत यांनी पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडीसोबत राहण्याची भूमिका घेतली होती, तर बसवराज पाटील व सुरेश कोळेकर यांनी २००९ ते २०२४ पर्यंत भालके कुटुंबाशी निष्ठा राखली आहे. त्यामुळे भगीरथ भालके तिघांपैकी कोणाला हिरवा कंदील देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील आर्थिक उलाढाल पाहता काही जण जिल्हा परिषद निवडणुकीपासून दूर राहण्याच्या मनःस्थितीत असले, तरी भोसे गटातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुकता कायम आहे.
---
चौकट
गावनिहाय मतदारसंख्या
निंबोणी (३५४०), रड्डे (४१८४), चिक्कलगी (२०९०), जंगलगी (१३६६), लवंगी (२५३८), सलगर बु. (३६४१), मारोळी (१७०२), शिरनांदगी (२१७२), भोसे (५२३८), नंदेश्वर (५८८८), हुन्नूर (२५८०), रेवेवाडी (१३५४), मानेवाडी (१६१६), पडोळकरवाडी (१८६०), लोणार (२३०४), ममदाबाद हु. (२३३४).
---
चौकट
गटातील प्रमुख समस्या
- शिरनांदगी साठवण तलावातील पाणी वितरण व्यवस्था
- मानेवाडी गावाचा कोणत्याही पाणी योजनेत समावेश नाही

- मंगळवेढा-हुन्नूर व चिक्कलगी-मारोळी ते जत सीमेपर्यंत रस्त्यांचा प्रश्न
- आरोग्य व शिक्षण सुविधा
- पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे
- शेतीसाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com