भुईकोट किल्ला बातमी

भुईकोट किल्ला बातमी
Published on

टुडे १ ॲंकर

PNE26W46355

अहिल्यानगर ः भुईकोट किल्ला विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभाग यांच्यातील सामंजस्य करार करताना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि स्टेशन कमांडर पी. सुनील कुमार. समवेत जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर.


भुईकोट किल्‍ल्याच्या विकासाला गती
शासन आणि लष्करामध्ये सामंजस्य करार ः पालकमंत्री विखे, आमदार जगताप यांच्या पाठपुराव्याला यश


अहिल्यानगर, ता.१ ः शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा रखडलेला मार्ग आता मोकळा झाला आहे. भुईकोट किल्ला विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभाग यांच्यात सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे किल्ल्याच्या संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने प्रस्तावित विविध विकासकामांना प्रत्यक्ष गती मिळणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि स्टेशन कमांडर पी. सुनील कुमार यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथील लष्कराच्या मुख्यालयात हा करार करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून भुईकोट किल्ल्याचा विकास करण्याची घोषणा केली होती. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी विशेष पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांतून केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेअंतर्गत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला १७ मार्च २०२५ रोजी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी मिळाली होती. मात्र, भुईकोट किल्ला लष्कराच्या अखत्यारीत असल्याने प्रत्यक्ष विकासकामे सुरू करण्यासाठी लष्कराची अंतिम परवानगी आवश्यक होती. या प्रक्रियेमुळे प्रकल्पाला विलंब झाला. आता महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभागामध्ये सामंजस्य करार झाल्याने विकासकामांच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.

इन्फो
असा होणार कायापालट

भुईकोट किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करताना पर्यटकांसाठी आधुनिक आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन या प्रकल्पात करण्यात आले आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून परिसरातील पायाभूत सुविधांपर्यंत विविध विकासकामे केली जाणार आहेत. यामध्ये भव्य प्रवेशद्वार, वाहनतळ आणि स्वच्छतागृहांची सुविधा उभारण्यात येणार आहे, तसेच किल्ल्याच्या ऐतिहासिक तटबंदीचे संवर्धन करून पर्यटकांना किल्ल्याचा इतिहास आणि वास्तूचे महत्त्व समजावे यासाठी इंटरप्रिटेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. किल्ल्याच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचे आकर्षण ठरणाऱ्या कामांमध्ये बुरूज क्रमांक १ ते ११ पर्यंत सुमारे १३७० मीटर लांबीचा नेचर वॉकवे प्रस्तावित आहे. किल्ला परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुक्त नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. परिसरातील प्रकाशव्यवस्था सुधारण्यासाठी सोलर स्ट्रीट लायटिंग करण्यात येणार आहे.

...................

पर्यटनाला नवी दिशा

भुईकोट किल्ला हा अहिल्यानगरच्या इतिहासातील महत्त्वाचा वारसा आहे. त्यामुळे या विकास प्रकल्पात किल्ल्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप आणि वास्तूचे महत्त्व जपत पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. किल्ल्याच्या संवर्धनासोबत पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध झाल्याने भविष्यात भुईकोट किल्ला अहिल्यानगरच्या पर्यटन विकासाचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची अपेक्षा आहे.


................

अहिल्यानगर जिल्ह्यात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे पत्रव्यवहार, तसेच पाठपुरावा केला होता. यासाठी त्यांचे सहकार्य मिळाले. पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्याचा आपला प्रयत्न असून, जिल्ह्याला लाभलेला ऐतिहासिक, नैसर्गिक आणि आध्यात्मिक वारसा स्थळांचा विकास करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे.

-राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री, अहिल्यानगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com