esakal | पुणे : तमाशा पंढरीतील चौसष्ट वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत

बोलून बातमी शोधा

पुणे : तमाशा पंढरीतील चौसष्ट वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत

कोरोना संसर्गामूळे तमाशा क्षेत्रातील ही ऐतिहासिक नोंद नारायणगाव नगरीत झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी तमाशा हंगाम वाया जाणार असल्याने फडमालक व तमाशा कलावंत यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

पुणे : तमाशा पंढरीतील चौसष्ट वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत
sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : महाराष्ट्र राज्याची पारंपरिक लोककला म्हणून ओळख असलेल्या तमाशाच्या राहुट्या नारायणगाव (ता. जुन्नर) तमाशा पंढरीत उभारण्याची व पाडव्याच्या मुहूर्तावर तमाशा करार होण्याची मागील चौसष्ट वर्षांची परंपरा या वर्षी प्रथमच खंडित झाली आहे. कोरोना संसर्गामूळे तमाशा क्षेत्रातील ही ऐतिहासिक नोंद नारायणगाव नगरीत झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी तमाशा हंगाम वाया जाणार असल्याने फडमालक व तमाशा कलावंत यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​

फडमालक व तमाशा कलावंत यांचे माहेरघर अशी नारायणगावची ओळख आहे.तमाशाला सुमारे दीडशे वर्षाची परंपरा आहे. नारायणगाव ग्रामस्थांनी फडमालक व तमाशा कलावंत यांना आश्रय दिला.अडचणीच्या काळात आर्थिक मदत करून तमाशा कलावंतांचे अश्रु पुसण्याचे काम येथील तीन पिढ्यातील ग्रामस्थांनी केले आहे. या मुळे फडमालक , तमाशा कलावंत यांचे नारायणगावकरा शी अतुट नाते निर्माण झाले आहे. या मुळेच फडमालक नारायणगावकराना मायबाप संभोधतात. जुन्या पिढीतील स्व.तुकाराम खेडकर, स्व.पांडुरंग मूळे,स्व. विठाबाई नारायणगावकर, स्व. चंद्रकांत ढवळपुरीकर,स्व.दत्ता महाडिक पुणेकर यांच्यासह रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, मालती इनामदार, आविष्कार मूळे, किरण ढवळपुरीकर,मोहीत व कैलास नारायणगावकर , सुरेखा पुणेकर आदी दिग्गज फडमालक व कलावंत नारायणगाव या कर्मभूमीत नावारूपाला आले.१९५६ पूर्वी तमाशाचे केंद्र मुंबई येथील हसनशेठ बांगडीवाला यांच्या तमाशा थीएटर मध्ये होते. त्या वेळी गावोगावच्या यात्रेसाठी तमाशा खेळाचे मुंबई येथून बुकिंग होत असे. १९५६ नंतर नारायणगाव येथून यात्रेसाठी तमाशा खेळाचे बुकिंग सुरू झाले. तेंव्हापासून मागील चौसष्ट वर्ष राज्यातील फडमालक दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नारायणगाव येथील तमाशा पंढरीत  राहुट्या उभारून तमाशा कार्यक्रम नोंदणी कार्यालय थाटात सुरु करतात.

नगर, पुणे, कोल्हापूर सह विविध जिल्ह्यातील यात्रा समितीचे प्रमुख नारायणगाव येथील तमाशा पंढरीत येऊन  यात्रा व उत्सवासाठी तमाशाची नोंदणी करतात. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात  करमणुकीसाठी तमाशा कार्यक्रम ठेवण्याची परंपरा अखंडितपणे सुरू होती. या मुळे दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर तमाशा करार करण्यासाठी येथील तमाशा पंढरीत यात्रा समितीचे प्रमुख व ग्रामस्थांची गर्दी होत असे.

फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान तीस फडमलकांचे तमाशाचे सुमारे पाचशे करार होत असत. या माध्यमातून फडमलकांची सुमारे आठ कोटी रुपयांची उलाढाल होत असे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात फडमलकांनी नारायणगाव नगरीत राहुट्या उभारल्या. यात्रा व उत्सवासाठी तमाशाची नोंदणी सुरू झाली.मात्र मार्च महिन्यात कोरोना संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन झाला. गावोगावचे यात्रा, उत्सव रद्द झाले. या मुळे मागील हंगाम वाया गेला. राहुट्या उभारन्याचा खर्च व कलावंताना दिलेली उचल याचा भुर्दंड फडमलकांनी सहन करावा लागला. या वर्षी जानेवारी महिन्यात शासनाने तमाशा सुरू करण्यास परवानगी दिली. फडमलकांनी मोठया उत्साहात रेसल (रंगीत तालीम)सुरू केली. कलावंताना  उचल दिली. मात्र पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्याने यात्रा उत्सव रद्द झाल्याने या वर्षी  राहुट्या उभारल्या नाहीत.अशी माहिती फडमालक मोहीत नारायणगावकर यांनी दिली.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात तंबूचे, आठमाही व हंगामी असे १५८ तमाशा फड आहेत.सलग दोन वर्ष हंगाम वाया गेल्याने फडमलक व कलावंत आशा सुमारे वीस हजार कुटुंबाची उपासमार सुरू आहे. फडमलकांचे ट्रक व इतर वाहने, तंबूचे व वाद्य साहित्य दोन वर्ष पडून आहे.वाहनांचा दुरुस्ती खर्च वाढला आहे.शासनाने फड उभारणीसाठी तंबूच्या तमाशाला बारा लाख रुपये,आठमाही तमाशाला आठ लाख रुपयेव हंगामी तमाशाला  चार लाख रुपये पॅकेज मिळावे. अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
रघुवीर खेडकर -अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत मंडळाचे.

(संपादन : सागर डी. शेलार)