बायोपिकने वाढला आत्मचरित्रांचा खप

प्रणिता मारणे 
सोमवार, 25 मार्च 2019

‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’, ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘भाई ः व्यक्ती की वल्ली’, ‘आनंदी गोपाळ’ असे अनेक बायोपिक प्रदर्शित झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही बायोपिक येत आहे.

पुणे - ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, आदी क्षेत्रांतील व्यक्तिमत्त्वांवर आधारित चित्रपटांची (बायोपिक) लाट हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आली आहे. त्यामुळेच त्या व्यक्तिमत्त्वांबद्दल जागृत झालेले कुतूहल पुस्तकांच्या माध्यमातून समजून घेण्याकडे वाचकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. ‘बायोपिक’मुळे चरित्र, आत्मचरित्रपर पुस्तकांचा खपही वाढला आहे.

‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’, ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘भाई ः व्यक्ती की वल्ली’, ‘आनंदी गोपाळ’ असे अनेक बायोपिक प्रदर्शित झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही बायोपिक येत आहे.  मोदी पंतप्रधान म्हणून कोणाला कसे वाटतील, यापेक्षा त्यांच्या वाटचालीबद्दल प्रेक्षकांना कुतूहल आहे. म्हणूनच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक पुस्तकांच्या दुकानांत मोदींच्या आयुष्यावर आधारीत पुस्तके मांडलेली दिसत आहेत.  

  बायोपिकचे प्रमोशन बघून चित्रपटाबरोबर आत्मचरित्रांची उत्सुकताही वाढलेली दिसते. बायोपिकमधून व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू प्रेक्षकांसमोर मांडले जातात. परंतु दोन तासांच्या चित्रपटांतून संपूर्ण आयुष्य मांडण्यासाठी मर्यादा येतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण टप्प्यांचा तपशील जाणून घेण्यासाठी वाचक आत्मचरित्रांकडे वळताना दिसत आहेत. बायोपिकमधून उलगडले गेलेले व्यक्तिमत्त्वाचे पदर अधिक विस्तृतपणे वाचण्याच्या इच्छेमुळे अनेक प्रेक्षकांचे रूपांतर वाचकांमध्ये होत आहे. अनेक व्यक्तिमत्त्वे प्रकाशझोतात आल्यानंतर त्यांच्यावरील पुस्तकांची मागणी वाढते. ‘शिवाजी महाराज’, ‘संभाजी महाराज’ आदी मालिका सुरू झाल्यानंतर त्यांच्यावरील कादंबऱ्या, ग्रंथांचीही विक्री वाढल्याचे काही प्रकाशकांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीवर चित्रपट आला की त्या काळात त्यांच्या चरित्रांची मागणी वाढणार हे समीकरणच असते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे, असे रसिक साहित्य भांडारचे विकास शिरोळे यांनी सांगितले.

डॉ. काशिनाथ घाणेकर प्रदर्शित झाल्यानंतर मेहता पब्लिशिंगने प्रकाशित केलेल्या ‘नाथ हा माझा’ पुस्तकाला मागणी वाढली. पुस्तकांच्या तीन ते चार हजार प्रतींची आवृत्ती काढली आणि त्यांची विक्रीही झाली. डॉ. घाणेकरांबद्दल उत्सुकता कायम आहे.
- सुनील मेहता, मेहता पब्लिशिंग हाउस

‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट आला तेव्हा ‘राऊ’ कादंबरीची मागणी वाढली. चित्रपट पाहून संबंधित व्यक्तिमत्त्वाबाबत अधिक तपशिलासाठी वाचक पुस्तकांकडे वळतात, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे प्रकाशन व्यवसायासाठी ‘बायोपिक’ उपयुक्त ठरत आहेत.
- देवयानी अभ्यंकर, कॉन्टिनेंटल प्रकाशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biopic increased the consumption of autobiography