‘बायोपिक’ला प्रेक्षकांची पसंती

Biopic
Biopic

पुणे - चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर एखाद्या काल्पनिक दृश्‍यात अनपेक्षित गोष्ट दाखवून चित्रपटातील रहस्याचा उलगडा होतो आणि चित्रपट संपून प्रेक्षक कल्पनेच्या जगातून बाहेर येतात. साधारणतः असे ढोबळ दृश्‍य काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृहांत दिसायचे. परंतु कालांतराने काल्पनिक दृश्‍यात रमण्यापेक्षा वास्तववादी चित्रपटांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून महत्त्वाच्या व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित चित्रपट (बायोपिक) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायला लागले.

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक बायोपिक आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम यांच्यावर एकापेक्षा जास्त बायोपिक आले. त्यामुळे बायोपिक हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवीन नाहीत. परंतु, २०११ मध्ये बालगंधर्व चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर व्यक्तीवर आधारित चित्रपट काढण्याचा ट्रेंड सुरू झाला, असे म्हणता येईल. संत तुकाराम, प्रकाश आमटे, लोकमान्य, एक अलबेला, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, भाई-व्यक्ती की वल्ली, ठाकरे असे अनेक बायोपिक आले. तसेच आनंदीबाई जोशी, ना. धों. महानोर यांच्या आयुष्यावरही बायोपिक येणार आहेत. अभिनेते सुबोध भावे यांनी बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर यांच्या व्यक्तिरेखा साकारल्या. त्यामुळे भावे आणि बायोपिक असे समीकरण झाले आहे. सुबोध भावे म्हणाले, ‘‘कथेवर आधारित चित्रपटांतून फक्त सामाजिक गोष्ट दाखवली जाते. लोक त्याला कंटाळले असून त्यांना मनोरंजन हवे आहे. त्यामुळे बायोपिकला पसंती मिळत आहे.’’

दीपक अंगेवार (प्रेक्षक) - त्याच-त्याच कथांवर आधारित चित्रपटांपेक्षा बायोपिक बघायला जास्त रंजक वाटतात. त्यामुळे या दृष्टिकोनातून हा मुद्दा उपस्थित राहतो की, सध्या तगडी स्क्रिप्ट नाही म्हणून बायोपिकचा ट्रेंड आला आहे का?  त्यामुळे बायोपिक येणे चांगले आहे. परंतु चांगल्या कथेवर आधारित चित्रपटही महत्त्वाचे आहेत.

महेश मांजरेकर (दिग्दर्शक) - बायोपिकचा ट्रेंड आलाय असे म्हणता येणार नाही. अनेक शतकांपासून बायोपिक येत आहेत. महत्त्वाच्या व्यक्तीचे आयुष्य प्रेक्षकांसमोर आणणे गरजेचे वाटले की बायोपिक येतात. परंतु, प्रेक्षक सैराटसारख्या कथेलाही पसंती देतात.

चिन्मय मांडलेकर (अभिनेता) - ज्याप्रमाणे प्रेमकथा, साहसकथा येतात. त्याप्रमाणे बायोपिकचा ट्रेंड आला आहे. एकाने काढला की दुसरा काढतो. परंतु बायोपिक काढणे हे नेहमीच्या चित्रपटापेक्षा जास्त अवघड असते. जे चांगले आहे त्याला प्रेक्षक पसंती देतात.

प्रकाश चाफळकर (भागीदार, सिटीप्राईड मल्टिप्लेक्‍स थिएटर) - शहरांनुसार बायोपिकची आवड बदलते. भाई, काशिनाथ घाणेकर हे चित्रपट पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये जास्त चालतात. परंतु, एखाद्या क्रांतिकारी व्यक्तिरेखेवर आधारित चित्रपट इतर ठिकाणी चालतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com