बीटकाॅईन प्रकरणातील आरोपींवरील एमपीआयडी कायद्यानुसारचा गुन्हा रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bitcoin

बीटकाॅईन प्रकरणातील आरोपींवरील एमपीआयडी कायद्यानुसारचा गुन्हा रद्द

पुणे : बिटकॉइन या आभासी चलनात (क्रिप्टो करन्सी) साखळी पद्धतीने गुंतवणुकीच्या आमिषाने हजारो नागरिकांची फसवणूक प्रकरणात पुणे सायबर पाेलिसांना सायबर तज्ज्ञ आणि माजी आयपीएस अधिकारी यांच्यावर दाखल आलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याचे (एमपीआयड) कलम रद्द करण्यात आले आहे. विशेष सत्र न्यायाधीश एस.एस.गाेसावी यांच्या न्यायालयाने आरोपींवरील एमपीआयडी कायदा रद्द ठरवत हे प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे वर्ग केले आहे. आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी आरोपींना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला आहे.

सायबर तज्ज्ञ पंकज प्रकाश घाेडे (वय 38, रा. ताडीवाला रस्ता) आणि माजी आयपीएस अधिकारी रविंद्र प्रभाकर पाटील (वय 45, रा. बिबवेवाडी) यांनी गाेपनीयतेचा भंग करुन गैरमार्गाने आरोपींच्या खात्यातील बीटकाॅईन त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याचे उघडकीस आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दाेघांवर एमपीयाआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यास बचाव पक्षाचे वकील राेहन नहार आणि ऍड. अमाेल डांगे यांनी आक्षेप घेत ते कलम रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

घाेडे आणि पाटील यांना सायबर पोलिसांनी १२ मार्च राेजी अटक केली हाेती. शनिवारी (ता.१९ ) त्यांची पाेलिस काेठडीची मुद्त संपल्याने त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले हाेते. तेव्हा ऍड. नहार यांनी आराेपींवर लावण्यात आलेल्या एमपीआयडी कायद्याला विराेध करत युक्तिवाद केला की, आरोपींनी काेणत्याही ठेवीदारांचे पैसे घेतलेले नाहीत. तसेच याबाबतचा काेणताही अर्ज पाेलिस अथवा न्यायालयाकडे आलेला नाही. त्यामुळे आराेपींविरोधातील एमपीअयडी कायदा रद्द करुन हे प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात यावे. ऍड. डांगे युक्तिवादा दरम्यान म्हणाले, पाेलिसांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास झाला असून केवळ तज्ञ म्हणून पक्षकाराने त्यात काम केले आहे. पाेलिसांसमाेर आराेपींच्या खात्यातून बीटकाॅईन पाेलिसांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. त्याबाबतचे स्क्रीनशाॅट त्या त्यावेळी काढून देण्यात आल्याने त्यात छेडछाड करण्याचा प्रश्नच नाही. पाेलिसांनीच बीटकाॅईनची चाेरी\केली असून यासंर्दभात त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे.

आरोपींनी परस्पर बीटकाॅईन त्यांच्या खात्यात वर्ग केले : सरकार पक्ष

आर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलिस महासंचालकांच्या सूचनेनुसार या गुन्ह्याचा तपास करण्यात आला आहे. आराेपींनी मोठ्या प्रमाणात बीटकाॅईन गैरव्यवहार केल्याचे निर्देशनास आले आहे. पाेलिसांना बीटकाॅईन बाबतची माहिती नव्हती. त्यामुळे तज्ज्ञांची मदत घेण्यात आली हाेती. मात्र, आराेपींनी परस्पर बीटकाॅईन त्यांच्या खात्यात वर्ग केले, असा युक्तिवाद सरकारी वकील मिलिंद वाडेकर यांनी केला.

आरोपींना संशयित वाॅलेटवर रक्कम वळवली

घाेडे याच्या ब्लाॅकचेन वेबसाईटची पाहणी करता पाेलिस वाॅलेटवर वळविलेली क्रिप्टाे करन्सी व्यतिरिक्त इतरही काही संशयित वाॅलेटवर रक्कम वळविलेली आहे. अटक आराेपींनी गुन्ह्यातील इतर आराेपींचे क्रिप्टाे करन्सी वाॅलेटवर नियंत्रण मिळवून त्याद्वारे गैरव्यवहार केला आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

Web Title: Bitcoin Case Canceled Mpid Act Against The Accused Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top