...अन् 'विजयी भव' म्हणत पिंपरीत जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. ढोल - ताशांच्या गजर अन्‌ फटाक्‍यांची आतषबाजी करण्याबरोबरच पेढे व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.

पिंपरी (पुणे) : राजकीय पटलावर दिग्गज नेत्यांना शह देत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शनिवारी (ता. 23) दुपारी मोरवाडी - लालटोपीनगर चौकात पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. ढोल - ताशांच्या गजर अन्‌ फटाक्‍यांची आतषबाजी करण्याबरोबरच पेढे व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. 'भाजप का नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो' अशा घोषणा देत 'फिर एक बार मोदी सरकार' आणि 'विजयी भव' या गाण्यावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला, तर महिला पदाधिकाऱ्यांनी अक्षरश: फुगड्या घातल्या. 

मोरवाडी येथील पक्ष कार्यालय आवारात शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर शैलजा मोरे, ज्येष्ठ नेत्या उमा खापरे, नगरसेविका प्रियंका बारसे, शारदा सोनवणे, शर्मिला बाबर, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, मोरेश्‍वर शेडगे, माऊली थोरात, अपर्णा मणेरीकर, आशा काळे, विना सोनवलकर, प्रमोद निसळ, संजय परळीकर उपस्थित होते. 

कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा 
रात्री उशीरापर्यंत राष्ट्रवादीच्या पाठींब्याने शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असे असतानाच एकदम सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडल्याचे समजले. डोळ्यावर आणि कानावर विश्‍वासच बसेना, यालाच म्हणतात "भाजप' अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. 

शहरात सशस्त्र बंदोबस्त 
राज्यातील राजकीय घडामोडींचे पार्श्‍वभूमीवर शहरात महत्वाचे चौक, धार्मिक स्थळे, सर्व पक्षांचे कार्यालये आदी ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करून परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता आहे.  

वडगावात फटाक्‍यांची आतषबाजी 
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मावळ तालुका भाजपच्या वतीने येथे फटाक्‍यांची आतषबाजी व रॅली काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या अनपेक्षित घडामोडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. मावळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी व पेढे वाटूनन आनंदोत्सव साजरा केला. शहरातून रॅलीही काढण्यात आली. 

भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, यदुनाथ चोरघे, सुधाकर ढोरे, अनंता कुडे, नितीन कुडे, किरण म्हाळसकर, किरण भिलारे सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP activist celebrate happiness at Pimpri chinchwad