भाजप एआय डेटा सेंटर मोर्चा

भाजप एआय डेटा सेंटर मोर्चा
Published on: 

PNE26W63092 सोलापूर ः एआय डेटा सेंटर प्रकल्पाच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात सहभागी भाजप आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते.
PNE26W63093 - एआय डेटा सेंटर प्रकल्पाच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात मार्गदर्शन करताना आमदार कल्याणशेट्टी.

अर्धवट अभ्यासाने आ. पवारांनी विकासात अडथळे आणू नये

आमदार सचिन कल्याणशेट्टी; एआय डेटा सेंटर प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजप नेत्यांचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३१ : सोलापूरच्या विकासासाठी मोठी गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता असलेल्या एआय डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा त्याची वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन करत भाजप नेत्यांनी रस्त्यावर ठिय्या मोर्चा काढला. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आमदार रोहित पवारांनी अर्धवट अभ्यासातून जिल्ह्याच्या विकासात अडथळे आणू नयेत, अशी टीका केली. तर आमदार देवेंद्र कोठे यांनी पवारांच्या भूमिकेवर बेअक्कल नेता म्हणत बोचरी टीका केली.
याप्रसंगी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. ‘धिक्कार असो, आमदार रोहित पवारांचा धिक्कार असो’, ‘या आमदाराचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय’ अशा घोषणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर दणाणून गेला. आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, जिल्ह्यात काही चांगले घडू लागले की पवार पुढे येतात. सत्तेत असताना त्यांनी काय केले? प्रकल्पाची पूर्ण माहिती न घेता लोकांची दिशाभूल करू नये. काहीही झाले तरी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत खंबीरपणे उभे आहोत. प्रकल्प बंद पाडण्याचा प्रयत्न झाल्यास प्रत्येक घरातील व्यक्तीला रस्त्यावर उतरवू, असा इशाराही त्यांनी दिला.
-------------------------------
आमदार कोठे म्हणाले, एआय डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध करणारे रोहित पवार पाण्याची नासाडी होणार असल्याचे नॅरेटिव्ह पसरवत आहेत. जाणीवपूर्वक विकासाला विरोध करण्याची त्यांची भूमिका लबाड लांडग्यासारखी आहे. ‘नेताच इतका बेअक्कल आहे तर कार्यकर्ते त्याहून महाबेअक्कल आहेत’, अशी बोचरी टीका त्यांनी केली. लवासा आणि ॲम्बी व्हॅलीतील वृक्षतोडीवेळी पर्यावरणाची चिंता पवारांनी का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
------------------------------
‘पंतप्रधान देवेंद्र फडणवीस’ असा उल्लेख
आमदार देवेंद्र कोठेंनी भाषणात सोलापूरच्या आयटी पार्क आणि रोजगाराच्या मागणीबाबत बोलताना ‘पंतप्रधान देवेंद्र फडणवीस’ असा उल्लेख केला. चूक लक्षात येताच त्यांनी ‘मुख्यमंत्री’ अशी दुरुस्ती केली आणि त्यानंतर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ असा उल्लेख केला. यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये ‘आज नाही तर उद्या हे होणारच आहे’, अशी चर्चा सुरू झाली.
-------------------------------
प्रकल्पाच्या गुंतवणुकीचे तीन आकडे!
एआय डेटा सेंटर प्रकल्पाची गुंतवणूक किती, याबाबत भाजप नेत्यांमध्येच एकवाक्यता दिसली नाही. आमदार देवेंद्र कोठे यांनी १ लाख २८ हजार कोटी, मनीष देशमुख यांनी १ लाख ३३ हजार कोटी, तर अन्य शहर पदाधिकाऱ्यांनी १ लाख ६३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सांगितली.
-------------------------------
मोर्चातही दिसली गटबाजी
आमदार विजयकुमार देशमुख गटाचे नगरसेवक मोर्चाला अनुपस्थित होते. आमदार देवेंद्र कोठे आणि सचिन कल्याणशेट्टी समर्थक रस्त्यावर ठिय्या देत असताना आमदार सुभाष देशमुख गटाचे नगरसेवक मात्र दूर उभे होते. प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनीही लांब राहणेच पसंत केले. महापौर विनायक कोंड्याल, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, पृथ्वीराज माने यांच्यासह नेत्यांची प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाषणे सुरू असतानाच काही नगरसेवक रस्त्यावर ठिय्या देत घोषणा देत होते. त्यामुळे मोर्चात समन्वयाचा अभाव दिसला.
-------------------------------
भाजप नेत्यांचे प्रकल्पाबाबतचे दावे
- प्रकल्पामुळे उजनी देखभालीसाठी मिळणाऱ्या १८० कोटीतून विकास
- सोलार प्रकल्पामुळे बाष्पीभवनाचे दीड टीएमसी पाणी वाचणार
- ९ टक्के धरणावर सोलार पॅनल बसवणार
- मच्छिमारांना कोणतीही अडचण होणार नाही
- राज्याच्या बजेटपेक्षाही मोठी गुंतवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.